तुम्ही रामटेकमधून निघालात आणि पोहोचलात बरोबर रामनवमीला ठीक आहे. काही काळाकरता धनुष्यबाण चोरला असला तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्याप्रमाणे राम सेतू बांधताना वानरसेना तर होतीच पण खार पण होती. त्याच्यामुळे प्रत्येकानं मी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. त्यावेळेला खारीने तिचा वाटा उचलला तर आपण सगळे जिथे माणसे एकत्र आलो तर लंकादहन करू शकत नाही का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. प्रभू रामचंद्राचं नाव लिहून दगड टाकला तरी तो तरंगायचा, आता राजकारणात तेच झालेलं आहे. प्रभू रामाचं नाव घेऊन दगड तरंगत आहेत पण त्या दगडांवर पाय ठेवू लंकेत जाण्यासाठी ते दगड तरंगले होते. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. मग खऱ्या रामभक्तांनी करायचं काय? ते राम भक्ताचं काम शिवसैनिकांनी करावं, अशी अपेक्षा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
आपल्याला देशाच्या संविधानाचा बचाव करायचा नाही तर संरक्षण करायचं आहे. बचाव बचाव म्हणजे हे थोडसं अअसहाय्यतेचं लक्षण आहे. मी माझ्या संविधानाचं संरक्षण करणार हा एक आत्मविश्वास तुमच्यात असला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोण कोणाची हिंमत आहे बघतो ना, संविधानाला किंवा लोकशाहीला नष्ट करण्याची या देशात हिंमत कोण करतंय तेच मी बघतो ना. मी आहे माझ्याशी गाठ आहे. मी रक्षण करणार माझ्या लोकशाहीचं आणि माझ्या देशाचं हा आत्मविश्वास आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ज्या एका जिद्दीने रामटेक ते इथपर्यंत पायी आलात. मला आता तुम्ही जिथून जिथून आला असाल वाड्या, वस्त्या, पाड्या, खेड्यामध्ये ही तुमच्यातली जिद्द आणि इर्षा आहे ना ती तिकडे पसरवण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. असेच सोबत राहा तुम्ही सगळेजण सोबत आहात हीच माझी ताकद आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कागदावरचा नेला असला तरी हे बाण माझे माझ्या भात्यात आहेत. हे बाण नाहीत तर ब्रह्मास्त्र असून माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.