पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधून आपण मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे ठणकावून सांगितले. तरीही या विषयावरुन उडालेला धुरळा अद्याप खाली बसल्याचे दिसत नाही. कारण पिंपरी चिंचवड शहरात “दादा तुमच्या सोबत” असे फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय होऊ लागले आहेत. या फ्लेक्सवर राष्ट्रवादीच्या नावाचा आणि चिन्हाचा कुठलाही उल्लेख नसल्याने चर्चा वाढू लागल्या आहेत.राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी हे फ्लेक्स लावले आहे. फ्लेक्सवर राष्ट्रवादीचा उल्लेख टाळल्याचे पहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे जाहीररित्या सांगितले होते. त्यामुळे पिंपरी चिंचवडचे राजकारण देखील वेगळ्या दिशेने जाताना पहायला मिळत आहे.
अजित पवार आपले नियोजित कार्यक्रम रद्द करून एकदम गायब झाले होते. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे सर्वच संभ्रमात असल्याचे पहायला मिळत होते. राष्ट्रवादीत फूट पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र अजित पवारांनी त्यावर पडदा टाकत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये लागलेले हे फ्लेक्स वेगळेच संकेत देता आल्याचे बोलले जात आहे.
आमदार अण्णा बनसोडे यांच्यानंतर आता स्थानिक नगरसेवक देखील अजित पवार यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत अजूनही धुसफूस असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे “दादा तुमच्यासोबत” हे फ्लेक्स चर्चचा विषय ठरत आहे.