नाशिक महानगरपालिकेचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन, असा होणार लाभ..

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: शहरातील अंगणवाडी सेविकांना दोन हजार तर मदतनिसांना १६०० रुपये मानधनवाढ करण्याच्या महासभेच्या ठरावाला आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वीच शहरातील ३१० अंगणवाडी सेविका व ३०२ मदतनीसांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून १९९५ पासून अंगणवाड्या चालविल्या जातात. यासाठी मुख्य सेविका, सेविका व मदतनीस अशा पदांवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना तुटपुंजे मानधन मिळते. त्यामुळे महापालिकेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व गटनेते विलास शिंदे यांनी या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत मागणी केली होती.

जनावरांनाही देऊ नये असा निकृष्ट दर्जाचा आहार; अंगणवाडीतील हजारो लेकरं अन् स्तनदा मातांच्या आरोग्याशी क्रूर खेळ

महिला व बालकल्याण समितीनेही ३१ डिसेंबर २०२० रोजीच्या सभेत ठराव केला. त्यानुसार प्रशासनाने ३१ मे २०२१ रोजी महासभेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव पाठविला. मात्र, महासभेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपये मानधन वाढीचा ठराव केला. तत्कालीन आयुक्तांनी या वाढीला विरोध केला होता. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरांतही वाढ झाली आहे. तुटपुंज्या मानधनात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूतीचे धोरण ठेवून त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी बोरस्ते यांनी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुक्तांनी या वाढीला मान्यता दिली आहे.

असा होणार लाभ:

महासभेने केलेल्या ठरावानुसार अंगणवाडी मुख्य सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मानधनात प्रतिमहा प्रत्येकी दोन हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुख्य सेविकांचे वेतन ८५०० रुपये, तर सेविकांचे वेतन ७६२० रुपयांपर्यंत होणार आहे. अंगणवाडी मदतनिसांचे मानधन दरमहा ७ हजार रुपये होणार आहे. या निर्णयाचा फायदा पाच मुख्य सेविका, ३०५ अंगणवाडी सेविका व ३०२ मदतनिसांना होणार असल्याची माहिती प्रशांत पाटील यांनी दिली.

सावधान, अतिवेग बेततोय नाशिककरांच्या जीवावर; ७ महिन्यांत शहरात इतक्या चालकांचा मृत्यू

Source link

By jaghit