यावर्षी सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली होती. फेब्रुवारीमध्ये आलेल्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान केले. त्यामुळे तूर लागवडीला त्याचा मोठा फटका बसला. परिणामी यावर्षीचे तुरीचे उत्पादन नावापुरतेच झाले. कडधान्यासोबत डाळींचे सेवन आपल्याकडे मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यात तूरडाळीला सर्वाधिक मागणी असते. तूरडाळीची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून तूरडाळ आयात केली जाते. डाळीचे दर वाढू नयेत, याची काळजी सरकार घेत असते, मात्र यावेळी तूरडाळीचे सर्वाधिक भाव वाढले आहेत. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये तूरडाळीचे घाऊक बाजारातील भाव ९० रुपये किलो असे होते. जून, जुलै महिन्यापर्यंत ते १२० रुपये किलोवर गेले. त्यामुळे किरकोळ बाजारात तूरडाळ १२० ते १३० रुपये किलो झाली होती.
मात्र, ऑगस्टमध्ये हे भाव आणखी वधारले. आता घाऊक बाजारात तूरडाळ ११५ ते १४० रुपये किलो झाली आहे. त्यामुले किरकोळ बाजारात हे भाव १४० ते १६० रुपये किलो इतके आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना डाळ खरेदी करणे कठीण झाले आहे. तूरडाळींप्रमाणे इतर डाळींच्या दरातही वाढ झाली आहे. उडीद डाळीचे घाऊक बाजारातील भाव ११० रुपये किलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात १२० ते १२७ रुपये किलो आहे. मूगडाळीचे भावही घाऊक बाजारात १०० रुपये किलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मूगडाळ १०६ ते ११० रुपये किलो आहे. चणाडाळीचे भाव मात्र स्थिर आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात चणाडाळ ६० रुपये किलो आहे. परिणामी किरकोळ बाजारात ती ७० ते ७५ रुपये किलो आहे.
कडधान्यांचीही भाववाढ
डाळींपाठोपाठ कडधान्यांचीही भाववाढ सुरू झाली आहे. कडधान्याच्या एकूणच लागवड पाण्याखाली गेल्याने यावर्षी बाजारात येणारे कडधान्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यानुसार मूग, मटकी, चणे, वाटाणे, वाल, राजमा यांच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे.
यावर्षी आलेल्या अवकाळी पावसाने कडधान्याचे पीक पाण्याखाली गेल्याने कडधान्य आणि डाळींचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे बाजारातील आवकही कमी झाली आहे. परिणामी डाळींच्या दरात वाढ सुरू झाली आहे. तूरडाळीचे दर सर्वाधिक वाढले आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
– निलेश वीरा, संचालक, अन्नधान्य बाजार
असे आहेत सरासरी भाव
कडधान्य घाऊक (प्रतिकिलो) किरकोळ दर
चणे – ६० रु. ७०-७५ रु.
वाटाणे – ६५ रु. ७५-८० रु.
मूग – ९५ रु. ११५-१२५ रु.
मटकी १०८ रु. १२०-१३० रु.
वाल २०० रु. २२०-२४० रु.