पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव कोणत्या अर्थाने घेतले हे माहिती नाही. मला कुणीही पराभूत करू शकत नाही, अशी पंकजा मुंडेंची भावना असेल तर ते दुर्दैवी आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा करणे, हेदेखील अयोग्य आहे. पंकजा मुंडे या पंतप्रधान मोदी यांना आव्हान देऊ शकत नाहीत. मला वाटतं, पंकजा मुंडे यांच्या विधानाचा तसा अर्थही काढला जाऊ नये. पंकजा मुंडे या भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी आजवर भाजप आणि पंतप्रधान मोदींविषयी अनेकदा नाराजी व्यक्त केली असली तरी त्या पक्षाचे काम एकनिष्ठपणे करतात, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले.
तर दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची पाठराखणही केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी भाजप पक्ष तळागाळापर्यंत पोहोचविला. बहुजन समाजापर्यंत पक्ष पोहोचवण्याचे काम केले. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी तीच वाटचाल कायम ठेवली व पक्षाचे विस्तारासाठी परिश्रम घेतले. त्यामुळेच ज्या ठिकाणी भाजपची उपेक्षा होती त्या ठिकाणी भाजपच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच जनतेच्या मनामनात असल्याने माझा कुणीच पराभव करू शकत नाही असं पंकजा मुंडे यांना वाटणे स्वाभावीच एकच आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
सुधीर मुनगंटीवारांकडून पंकजा मुंडेचा बचाव
पंकजा मुंडे यांचे पंतप्रधान मोदी यांच्याविषयीचे वक्तव्य हे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. हे वक्तव्य करुन पंकजा मुंडे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. मोदीजी मला संपवू शकत नाही, असे पंकजा मुंडे बोलल्याच नाहीत. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण मी जनतेच्या मनात असेन तर मी वंशवादाच्या व्याखेत बसणार नाही, हा पंकजांच्या बोलण्याचा अर्थ होता, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
आता ग्रामंपचायत आणि इतर निवडणुका सुरु होत आहेत. आता या निवडणुका आपण वेगळ्या पद्धतीनं लढूया, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. आपल्याला जातपात, पैसा, प्रभाव याच्या पलीकडे जाऊन विचार करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मी सुद्धा वंशवादाचं प्रतीक आहे मात्र मला कोणी संपवू शकत नाही, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत. जर मी तुमच्या मनावर राज्य केले तर ते तसं करु शकणार नाहीत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले होते.