मराठा समाजाने पत्रिका कुंडली याच्यात अडकू नये. मुला मुलींच्या कर्तृत्वाला प्राधान्य द्यावं. ९६ कुळाचा बाऊ न करता सर्वांनी मराठा म्हणून एकत्र येऊन लग्न ठरवावं. अक्षतांची नासाडी न करता मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित लग्न करता येतंय का हे पाहावं. जेणेकरुन होणारा खर्च वाचवून वधू-वरांच्या भविष्यासाठी त्यांच्याच नावाने ठेव म्हणून ते पैसे ठेवता येतील, असं मोलाचं मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं.
सध्या मराठा समाज अनेक प्रकारच्या अडचणीत आहे. नोकरी, जमीन, शिक्षण नसल्याने तरुणांची लग्न होत नाहीयेत. शिवाय अनेक जण कर्ज काढून सण साजरे करतात. मात्र असे न करता आपण प्रगतीकडे कशी वाटचाल करू याकडे प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. चैत्र पाडव्याच्या निमित्ताने मी अनेक गावांमध्ये फिरलो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये १७ लाख मराठा आहेत, पण काम नसल्याने एका एका गावात ५०-६० तरुण रिकामे बसत असल्याचं आढळलं. या मुलांची लग्न जमत नाहीत ही परिस्थिती गंभीर आहे. मराठा समाजातील लोकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. या योजनांचा तरुणांनी फायदा करून घ्यावा. सध्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या असल्याने लग्न ठरवणे ही तारेवरची कसरत होत आहे. म्हणून अनेक एजंट याचा गैरफायदा घेऊन पालकांना फसवत आहेत. मात्र या फसवणुकीपासून आपण सावध राहिले पाहिजे. मराठ्यांनी आता जागे व्हायची वेळ आलीये, अशी कळकळीची विनंती त्यांनी सरतेशेवटी केली.