‘महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांनंतरच मी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या नंदनवन या बंगल्यावर चार ते साडेचार तास भेटलो. यावेळी मी शिंदे यांना सांगितलं की, हे सरकार जनतेच्या हिताचं नाही, उद्धवजींकडून चूक होत आहे. तुम्ही त्यांना निर्णय बदलायला सांगा, असं म्हणत या उठावाचं बीज मीच शिंदे यांच्या डोक्यात पेरलं होतं,’ असा गौप्यस्फोट विजय शिवतारे यांनी केला आहे.
‘महाविकास आघाडीची स्थापना निवडणुकीच्या आधीच’
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अत्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेना आणि भाजप युतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेले. मात्र निवडणूक निकालानंतर भाजप ठरल्याप्रमाणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद विभागून घेत नसल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. मात्र महाविकास आघाडीचा निर्णय हा निवडणुकीनंतर नव्हे तर निवडणूक होण्याच्या आधीच झाला होता, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
‘उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत समझोता केला होता. कोणत्या जागा पाडायच्या, कोणत्या निवडून आणायच्या याची रणनीती ठरवण्यात आली होती,’ असा आरोपही शिवतारे यांनी केला आहे.
दरम्यान, विजय शिवतारे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर आता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने त्यांच्या गटातील नेत्यांकडून काही प्रतिक्रिया देण्यात येते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.