‘ठाकरे घराण्यातील व्यक्तींसोबत तुमचं कौटुंबिक नातं राहिलेलं आहे, मात्र यंदा शिवसेनेचे दोन मेळावे होते आहेत. तुम्ही कोणाचं भाषण ऐकणार आणि तुमच्या मते खरी शिवसेना कोणाची?’ असा प्रश्न माध्यमांकडून पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. त्यावर पंकजा म्हणाल्या की, ‘मी या सगळ्या गोष्टींकडे कुतूहलातून पाहात आहे. कारण मी या सगळ्यातून गेली आहे. मी एका मेळाव्याचं सीमोल्लंघन करून मेळाव्यासाठी दुसरं स्थान निर्माण केलं आहे. मुंबईत होत असलेल्या मेळाव्यांमध्ये दोन्ही नेत्यांसाठी आज खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन असणार आहे. या मेळाव्यातून ते जनतेच्या मनाला, प्रश्नांना हात घालतील, अशी अपेक्षा आहे.’
‘माझ्या दसऱ्या मेळाव्यासाठी कसलीही तयारी नाही’
मुंबईत होत असलेल्या दसऱ्या मेळाव्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याची चर्चा असतानाच पंकजा मुंडे यांनी मात्र आपला दसरा मेळावा अतिशय साध्या पद्धतीने होणार असल्याचं सांगितलं आहे. ‘मुंबईत होत असलेले दोन्ही मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सगळ्यांचं लक्ष या मेळाव्यांकडे आहे. सगळ्या माध्यमांचं लक्षही या मेळाव्यांकडे आहे. त्यामुळे मी दोन्ही मेळाव्यांना शुभेच्छा देते. मात्र या दोन्ही मेळाव्यांपेक्षा एकदम वेगळा मेळावा आपला असणार आहे. कारण आपल्या मेळाव्यात खुर्च्या मांडलेल्या नाहीत, कुठलीही व्यवस्था नाही. डोंगर-कपारीत काहीही व्यवस्था नसताना होत असलेला माझा मेळावा आहे,’ असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, माझा दसरा मेळावा हा राज्यभरातील लोकांसाठी असतो. इथं देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा, वाशिम ते अगदी बारामतीपासून विविध ठिकाणचे लोक येत असतात. हा वंचितांच्या विषयांना हात घालणारा मेळावा आहे. या मेळाव्यात लोकांमध्ये प्रचंड उत्साह असतो, त्यांना काय ऐकायचं असतं ते मला द्यावं लागतं, असंही पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.