अद्वय हिरे यांनी शिवसेना भवनात पक्षात प्रवेश केला होता. मात्र, हिरे कुटूंब हे राजकारणातील एक महत्वाचे कुटूंब आहे. सध्या महाविकास आघाडीच्या सभा ठरलेल्या आहेत. शिवसेना म्हणून वेगळ्या सभा घेणार आहोत. खेडनंतर मालेगावात सभा होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रशांत हिरे यांच्यासाठी मालेगावला आले होते. आता उद्धव ठाकरे अद्वय हिरे यांच्यासाठी सभा घेणार आहेत. अद्वय हिरे यांच्यावर मोठी जवाबदारी देण्यात येईल, असं संजय राऊत म्हणाले.
मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो गद्दरांचा नाही, असा टोला संजय राऊत यांनी दादा भुसे यांना लगावला. मुस्लीम समाज फक्त मोदींनाच पाठिंबा द्यावा का? मुस्लीम समाजानं फक्त भाजपला मतदान करावं का? महाराष्ट्र आणि देशात मुस्लीम समाजाचा पाठिंबा शिवसेनेला आहे, त्यात गैर काही नाही, असं संजय राऊत म्हणाले.
मालेगावच्या सभेत बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. आदिवासी रस्त्यावर आहेत, शेतकरी रस्त्यावर आहेत, विद्यार्थी रस्त्यावर आहेत, आत्महत्या वाढलेल्या आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सरकार आहे का नाही अशी परिस्थिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार का रखडला आहे. मंत्री मंत्रालयात जात नाहीत कारण कधी घरी जावे लागेल हे त्यांना माहिती आहे. सर्वांचे डोळे सुप्रीम कोर्टाकडे लागलेले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र लढणार आहोत. आमची चर्चा सुरु आहे, जागा वाटपावरून मविआमध्ये वाद होणार नाही याची खात्री मी देतो, असं संजय राऊत म्हणाले. महापालिका संदर्भात देखील चर्चा सुरू आहे. ज्या मोठ्या महापालिका आहेत त्या ठिकाणी एकत्र लढण्याची इच्छा आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
शिवसेनेतून बाहेर पडलेला गट लवकरच शिवसेनेत परत येणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडून सर्व पक्षात परत येतील, पण आम्ही शिंदेंना परत घेणार नाही, असंही राऊत यांनी सांगितलं.