नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत एकमेकांच्या विरुध्द उभे असलेले हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले होते. दोघांच्या भेटीकडे पुणेकरांच्या नजरा खिळल्या होत्या. दोघांनीही एकमेकांशी मनमुराद गप्पा मारल्या. राजकारणविरहित विविध विषयांवर चर्चा केली.
गिरीश बापट यांनी या परिसराचा विकास करण्यासाठी अनेक भरीव योजना कार्यान्वित केल्या. तसेच ३० वर्ष पुण्याच्या राजकारणाचा स्थर कसा असावा, याचा उत्तम परिपाठ घालून दिला आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे आज आम्ही दोघे एकाच मंचावर आज आलो आहोत, असे याप्रसंगी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले. मी खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या निधीमधून कसबा गणपतीच्या सुशोभिकरणासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो, असं देखील धंगेकर म्हणाले. दरम्यान, निवडणुका संपल्या की विरोधक देखील हातात हात घालून समाजकार्य करण्यासाठी सज्ज होतो. मात्र आज मी हेमंत दादांचे खरंच धन्यवाद म्हणतो, कारण त्यांच्यामुळे मला आज संपूर्ण देश ओळखायला लागला आहे, असं म्हणत धंगेकरांनी रासनेंना चिमटा काढला.तर पुढे काम करताना हेमंत दादांचे नक्कीच मार्गदर्शन घेईल, असं देखील धंगेकर म्हणाले.
आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आता विकासाची कामेही एकमेकांच्या हातात हात घालून आणि सहकार्याने कर. या परिसराचा विकास कसा होईल यावर एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असं यावेळी हेमंत रासने म्हणाले.