यापूर्वी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र काही काळानंतर त्यांचा विरोध मावळला होता. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने बृजभूषण सिंह पुण्यात येत आहेत. १५ जानेवारीला त्यांचे आगमन होईल. मात्र सिंह यांच्या पुणे दौऱ्याविषयी कुठल्याही मनसे नेता-पदाधिकाऱ्याने काहीही बोलू नका, असे आदेश राज ठाकरेंनी दिल्याचं वसंत मोरेंनी सांगितलं.
वसंत मोरे यांनी काय सांगितलं?
बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंना अयोध्येत येऊ दिलं नाही, असा काही विषय नाही, प्रकृतीच्या कारणास्तव राज ठाकरे अयोध्येला गेले नव्हते. बृजभूषण सिंह यांच्या पुणे दौऱ्यावर कोणीही बोलू नये, हे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत. तसं नसतं, तर वेगळं चित्र निर्माण झालं असतं, आमच्याही अंगाला दहा वर्ष महाराष्ट्राची लाल माती लागली आहे, आम्हालाही तिचा रंग दाखवता आला असता, राज ठाकरेंना महाराष्ट्रात काय देशात अडवण्याची कोणाच्यात ताकद नाही, इशारा देणं त्यांचं कामच आहे, ते तेच करत आले आहेत. राज ठाकरेंचे आदेश आहेत, त्यामुळे काही बोलता येणार नाही, असं वसंत मोरे म्हणाले.
हेही वाचा : खडसे तुम्हाला जेलमध्ये पाठवणारच, डब्याची व्यवस्था करून ठेवा | Mangesh Chavan
बृजभूषण काय म्हणाले?
राज ठाकरे विरोध करत नाहीत, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना माझा सैद्धांतिक विरोध होता. मी इतकंच म्हटलं होतं, की तुम्ही इथल्या संतांची माफी मागा, जनता, मुख्यमंत्री-पंतप्रधान यांची माफी मागा, चूक झाली हे मान्य करा, ही एकच अट होती. मी कुस्तीपटू आहे, देशभरात माझं येणं जाणं असतं, महाराष्ट्रातील कुठल्याही पैलवानाने सांगावं, की नेताजी माझ्यावर प्रेम करत नाहीत, त्यांना मी केवळ खाऊ पिऊच घालत नाही, तर मायाही करतो, असं बृजभूषण सिंह म्हणाले.
हेही वाचा : अमित शाहांची मध्यस्थी, शिंदे-बोम्मई आमनेसामने चर्चा करणार, अमोल कोल्हेंची माहिती