raj thackeray, मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर काय करणार? राज ठाकरेंचं रोखठोक उत्तर - raj thackeray comment on election commission eknath shinde faction as real shivsena allots name and symbol

नवी मुंबई : उद्धव ठाकरेंचं नेतृत्व अमान्य असल्याचं कारण सांगून शिवेसेनच्या ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी संसार थाटून आता नऊ महिने उलटून गेलेत. दरम्यानच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या हातून पक्ष निसटला आणि प्राणापेक्षा प्रिय असलेलं पक्षचिन्हही निसटलं. पक्षातील आमदार-खासदारांचं बहुमत एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याचं सांगत निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निर्णय देत उद्धव ठाकरे यांना दणका दिला. निवडणूक आयोगाने ज्या निकषांआधारे हा निकाल दिला, त्याची संपूर्ण देशभरात चर्चा होतीये. या सगळ्यात मनसे पक्षाकडे एकच आमदार आहे, मग त्यानेच जर वेगळा विचार केला तर त्याच्या ताब्यात मनसे पक्ष देणार का? असा मिश्किल सवाल काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला होता. त्यांच्या प्रश्नाला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी खुमासदार शैलीत उत्तर दिलंय.

मनसेने आयोजित केलेल्या राजभाषा महोत्सवानिमित्त ‘वाचन ते राजकारण’ अशा सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारी राज ठाकरे यांची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत झाली. या मुलाखतीत प्रबोधनकार ठाकरे यांच्या भूमिका, बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं राजकारण, सद्यस्थितीतील महाराष्ट्राचं राजकारण, ठाकरे सरकारला उलथवून नव्याने आलेलं शिंदे-फडणवीस सरकार, शिवसेनेना फुटीचा प्रसंग, निवडणूक आयोगाचा निकाल अशा सगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी रोखठोक मतं मांडली.

मनसेच्या आमदाराने पक्षावर दावा केला तर काय करणार?

मनसेच्या एकमेव आमदाराने उद्या पक्ष आणि रेल्वे इंजिनावर दावा केला तर निवडणूक आयोग त्याच्या हवाली मनसे पक्ष करणार का? असा कळीचा सवाल राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विचारला होता. अजित पवारांचा हाच धागा पकडून मुलाखतकार अतुल परचुरे यांनी राज ठाकरे यांना हाच प्रश्न विचारला. सगळ्या पक्षांच्या मनात कुठेतरी ही भीती आहे, उद्या जर तुमच्या आमदाराने वेगळी भूमिका घेतली, तर आपण काय कराल? त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. पूर्वी अशा गोष्टी कधीही होत नव्हत्या. विरोध व्हायचा तर तो आमने सामने व्हायचा. आमचे आमदार राजू पाटील यांना मला विचारायचं आहे की पक्ष घेता काय हातात? एकदा बघा, आमचं काय जळतं ते कळेल, दिवस-रात्र बर्नोल लावत असतो…” अशा मिश्किल शैलीत त्यांनी पक्षावर दावा सांगण्याच्या मुद्द्यावर नर्मविनोदी उत्तर दिलं.

शिवसेना फुटीच्या प्रश्नाला राज ठाकरे यांनी थेटपणे उत्तर देणं टाळलं असलं तरी येत्या २२ तारखेला गुढीपाडव्याच्या सभेत मी सगळा पिक्चर दाखवणार आहे, असं सांगत त्यांनी महाराष्ट्रवासियांची उत्कंठा वाढवली. शिवसेना फुटायला नको होती का? शिवसेना बरोबर माणसाच्या हातात गेली का? तुम्ही ज्या शिवसेनेत काम केलं, तीच शिवसेना फुटलेली आहे, त्यावर तुम्हाला काय वाटतं? असे प्रश्न विचारुन मुलाखतकारांनी राज ठाकरे यांना खुलविण्याचा प्रयत्न केला. पण ‘मी कोणताही ट्रेलर दाखवणार नाही. गुढीपाडव्याच्या सभेत सगळा पिक्चर दाखवेन. शिवतीर्थावरील सभेत सविस्तर बोलेन’, असं राज ठाकरे यांनी ठासून सांगितलं.

Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: