Gram Panchayat Election Maharashtra 2022 | काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी ग्रामपंचायतीच्या निधीसंदर्भात वक्तव्य केले होते. त्यानंतर नितेश यांनी कणवकली तालुक्यातील नांदगावमधील गावकऱ्यांना अक्षरश: धमकावले आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही. याची पुरेपूर काळजी मी घेईन, असे नितेश यांनी म्हटले.
हायलाइट्स:
- मला विचारल्याशिवाय कोणीही तुम्हाला निधी देणार नाही
- निधी कोणाला द्यायचा त्याची सर्व सूत्रं माझ्या हातात
- पोटात एक आणि ओठात एक, असा प्रकार मी करत नाही
नितेश राणे यांनी नांदगावमधील ग्रामस्थांना थेट धमकीच दिल्याचे दिसत आहे. आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल. चुकूनही येथे माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर मी एक रुपयाही देणार नाही. याची पुरेपूर काळजी मी घेईन. जिल्हा नियोजन, ग्रामविकास, २५:१५ निधी असो किंवा केंद्र सरकारचा निधी असो. हा निधी कोणाला द्यायचा त्याची सर्व सूत्रं माझ्या हातात आहेत. पालकमंत्री असो, जिल्हाधिकारी असो, संबंधित कुठलाही मंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा मुख्यमंत्री, कोणीही मला विचारल्याशिवाय नांदगावमध्ये निधी देणार नाहीत. याला तुम्ही धमकी समजा किंवा काहीही समजा, असे नितेश राणे यांनी म्हटले. यापूर्वीही नितेश राणे यांना ग्रामपंचायतीच्या निधीवापासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे आता निवडणूक आयोग यासंदर्भात काही कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.
भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आणा, ५० लाखांचा निधी देऊ: राणे
काही दिवसांपूर्वीच नितेश राणे यांनी एका गावाला ऑफर दिली होती. भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला ५० लाखाचा निधी देऊ अशी घोषणाच नितेश राणे यांनी केली होती. त्यांच्या या वक्तवयाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. येत्या १८ तारखेला सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
सुषमा अंधारे आणि नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध
काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा कोकणात गेली होती. त्यावेळी सुषमा अंधारे यांनी राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत सुषमा अंधारे या शिवसेनेविरुद्ध बोलताना दिसत होत्या. सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओला आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले होते. नितेश राणेंना अभ्यासाची गरज असून त्यांनी २० वर्षांपूर्वीचा व्हिडिओ पोस्ट करताना काही बाबी लक्षात घ्यायला हव्या होत्या. सुषमा अंधारेंनी फेसबुक पोस्टमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत नारायण राणे यांच्यावर जी टीका केली होती त्याचा व्हिडिओ पोस्ट केला होता. याचा उल्लेख करताना अंधारेंनी देवेंद्र फडणवीस हे नितेश राणेंचे प्राणप्रिय नेते असल्याचा टोला लगावला आहे. भर सभागृहात नारायण राणे यांचं वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना नेता म्हणून कसं स्वीकारले, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.