इमारतीमधील ४२ कुटुंबाना सुखरूप काढले बाहेर
शांती उपवन हा कॉम्प्लेक्स सुमारे २२ वर्षे जुना आहे. या कॉम्प्लेक्समध्ये एकूण २४० कुटुंब राहतात. कॉम्प्लेक्समध्ये तडा गेलेल्या विंगमध्ये ४२ कुटुंब राहतात. इमारतीमधील सर्व कुटुंबातील सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन विभागाला यश आलं. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील हे काल रात्रीपासून स्वतः मदत कार्यास धावून आले होते. शिवाय मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले.
एफ विंगमध्ये जोरदार आवाज…
शनिवारी रात्रीच्या सुमारास कॉम्प्लेक्समधील एफ विंगमध्ये जोरदार आवाज झाला. काही घरांमध्ये मातीही पडली. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी इमारती बाहेर पळ काढला. काही क्षणातच इमारतीला भला मोठा तडा गेल्याचं रहिवाशांना दिसून आलं. याबाबत तात्काळ अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. या इमारतींमधील कुटुंबांना परिसरातील शाळा व समाज मंदिराच्या हॉलमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. त्याचबरोबर सदर इमारत निष्कासित करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्यावतीनं सांगण्यात आलं आहे. आम्हाला पर्यायी जागा देऊन आमचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी इमारतीमधीलल कुटुंबांनी केली आहे.
श्वान आणि ससा यांना दिले जीवदान, व्हिडिओ व्हायरल…
तडा गेलेल्या इमारतीमधून रहिवाशांना आणि सर्व कुटुंबांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पण रात्रीपासून या इमारतीमध्ये एक पाळीव कुत्रा आणि एक ससा अडकला होता. रात्रीपासून कुत्रा आणि ससा भुकेले होते. त्यांना पाणी पाजून बाहेर काढत जीवदान देण्यात आले आहे. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. एकूणच या घटनेने परिसरात काहिसं भीतीचं वातावरण आहे.