navratri 2022, तोरणा गडावरील छत्रपतींचे ग्रामदैवत 'मेंगाई देवी'; जिजाऊंनी देवीला अर्पण केले होते सोन्या-चांदीचे दागिने - shri mangai devi temple in pune velhe

पुरुषोत्तम मुसळे, भोर

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या वेल्हे तालुक्यातील तोरणा गडावर शिवकालीन अलंकाराचा साज चढवून मेंगाई देवीच्या नवरात्र उत्सवास सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ग्रामदैवत म्हणून या देवीला मान असून, जागृत देवस्थान अशी तिची ख्याती आहे.

वेल्ह्यापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम तोरणा गडावरील तळ्याजवळ मेंगाई देवीचे मूळ मंदिर आहे. शिवकालीन प्रथा व परंपरेनुसार देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. इंग्रजी राजवटीनंतर संस्थान खालसा होईपर्यंत हा सोहळा पारंपरिकपणे पार पडायचा. त्या वेळी छत्रपती व जिजाऊंनी देवीला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केलेले आहेत. उत्सवानंतर ते तहसील कार्यालयात जतन केले जातात. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशी वेल्हे गावात देवी अवतरली, अशी आख्यायिका सांगितली जाते. गावातील मंदिरातील देवीचा पाषाणाचा तांदळा जागृत म्हणून ओळखला जातो. नवरात्रीच्या काळात धार्मिक कार्यक्रम व यात्रोत्सव साजरा केला जातो. अश्विन शुद्ध प्रतिप्रदेला देवीला चांदीचा मुखवटा, दागिने घालून शिवकालीन परंपरेनुसार उत्सवाची सुरुवात होते. दसऱ्याला सनई-चौघडा, वाजंत्री, ढोल-लेझिम पथक यांच्यासह देवीच्या पालखीची शाही मिरवणूक निघते. उत्सवाचा खर्च सुरुवातीला छत्रपती घराण्याकडून मिळत होता. नंतर भोर संस्थांनाकडून नाममात्र खर्च मिळत असे. काही वर्षापासून सरकारने तो बंद केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मिरचीच्या बाजारासाठी यात्रा प्रसिद्ध

नवरात्री व्यतिरिक्त मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी भविक मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. माघ पौर्णिमेला देवीची यात्रा सुरू होते. पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या शुक्रवारपर्यंत यात्रा सुरू राहते. यात्रेमध्ये देशभरातून तांबड्या मिरचीचे व्यापारी सहभागी होतात. त्यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे ही यात्रा मिरचीच्या बाजारासाठीही प्रसिद्ध आहे.

असे जाता येते :
पुण्यापासून साठ किलोमीटवर अंतरावर वेल्हे गाव आहे. स्वारगेटवरून ठरावीक एसटी बस, कात्रजपासून पीएमपीची सेवा किंवा खासगी चारचाकी, दुचाकीने मंदिरापर्यंत जाता येते.

Source link

By jaghit