शुक्रवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास वर्षा किरण बोरकर (वय २५) आणि त्यांच्या सासू पुष्पा (वय ४२, रा. धम्मदीपनगर) या घरी होत्या. तीन युवक त्यांच्या घरी आले. ‘आम्ही जामसावळी येथून पालखीसाठी आलो आहोत, दान द्या’, असे एक ठकबाज त्यांना म्हणाला. पुष्पा या त्याला दहा रुपये देण्यासाठी गेल्या असता त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पुष्पा यांनी त्याला प्यायला पाणी दिले. ‘तुमच्या मागे संकट आहे’, असे ते पुष्पा यांना म्हणाले. संकट टाळण्यासाठी त्याने लाल रंगाचा धागा पुष्पा यांच्या हाताला बांधला. त्यानंतर पुष्पा व वर्षा बेशुद्ध झाल्या. त्यानंतर ठकबाजांनी पुष्पा यांच्या गळ्यातील आठ हजार रुपये किमतीची सोनसाखळी काढली व तिघेही पसार झाले.
या प्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन भालेराव, हेडकॉन्स्टेबल श्याम कडू, शिपाई नरेंद्र जांभूळकर, रोहित रामटेके, नारायण कोहचडे व अमित ठाकूर यांनी शोध घेऊन तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दागिने जप्त केले. तिघांची मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. तिघेही दुधाचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. जुलै महिन्यात जामसावळी हनुमान मंदिराचे नाव सांगून कळमेश्वरमधीलच तिघांना पाचपावली पोलिसांनी अटक केली होती.