modi kejriwal



पीटीआय, नवी दिल्ली : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकांची प्रमुख लढत ही आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी यांच्यात होईल. केजरीवाल यांना घाबरवण्यासाठीचे विविध डावपेच मोदी लढवत आहेत,’’ असा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी केला. केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने (सीबीआय) सिसोदिया यांच्या निवासस्थानी टाकलेल्या छाप्यानंतर प्रतिक्रिया देताना सिसोदिया बोलत होते.

‘सीबीआय’ने दिल्ली सरकारच्या अबकारी कर अंमलबजावणी धोरणात कथित भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यावर शुक्रवारी सकाळी सिसोदिया आणि सनदी अधिकारी आरव गोपीकृष्ण यांच्या निवासस्थानी छापे टाकले होते. या तपास संस्थेने १९ अन्य ठिकाणीही तपास केला.

दिल्लीतील अबकारी कराचे धोरण संपूर्ण पारदर्शक पद्धतीने लागू केले असल्याचे सांगून सिसोदिया यांनी स्पष्ट केले, की २०२१-२२ साठीचे हे धोरण सर्वात चांगले आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. मोदींचे सरकार अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी हे डावपेच खेळत आहे. केजरीवाल सरकारने शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची चर्चा अवघ्या जगात आहे.

सिसोदिया यांनी सांगितले, की माझ्या घरी छापा टाकणारे अधिकारी चांगले आहेत. त्यांना वरून छापा टाकण्यासाठी आदेश मिळाले आहेत. माझ्या कुटुंबीयांची कोणतीही गैरसोय त्यांनी केली नाही, यासाठी मी त्यांचे आभार मानेन. हा छापा टाकणाऱ्यांना (केंद्र सरकार) अबकारी कर धोरणातील गैरव्यवहारांबाबत काहीही देणेघेणे नाही. त्यांना केजरीवाल यांची भीती वाटते. कारण केजरीवालांवर जनतेचे प्रेम आहे. ते लोकप्रिय आहेत. ते राष्ट्रीय स्तरावर मोदींना समर्थ पर्याय म्हणून उदयास आले आहेत.

बहुमत मिळालेल्या पंतप्रधानांना हे शोभत नाही, अशी टीका करून सिसोदिया म्हणाले, की केजरीवाल आणि मोदींमध्ये फरक हा आहे, की केजरीवाल सदैव गरिबांचा विचार करतात. मोदी मात्र त्यांच्या निवडक मित्रांचे हित जपतात. केजरीवाल चांगली कामगिरी करणाऱ्यांना दाद देतात. मोदी मात्र विरोधी राज्य सरकारांना पाडण्याची स्वप्ने पाहतात. तसेच चांगली कामगिरी करणाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी ते ‘ईडी’, ‘सीबीआय’सारख्या सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करतात.

उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी गेल्या महिन्यात दिल्ली सरकारच्या अबकारी कर धोरण २०२१-२२ च्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेची ‘सीबीआय’द्वारे चौकशी करण्याची शिफारस केली होती. या प्रकरणी त्यांनी ११ अधिकाऱ्यांना निलंबितही केले होते.

काही दिवसांनी मलाही अटक : सिसोदिया

विशेषत: पंजाब निवडणुकीनंतर केजरीवाल यांच्यावरील जनतेच्या प्रेमात भरच पडली आहे, असे सांगून सिसोदिया म्हणाले, की आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रांत केजरीवाल सरकारने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीस रोखण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी सर्वप्रथम आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. पुढील काही दिवसांत मलाही अटक करण्यात येईल.





Source link

By jaghit

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: