किल्ले प्रतापगडावर ३६४ वा शिवप्रतापदिनाचा सोहळा पार पडतोय. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांसोबत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे आदी नेते उपस्थित आहेत. यासमयी केलेल्या भाषणात मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडीची तुलना औरंगजेबाशी तर शिंदेंच्या बंडाची तुलना शिवरायांच्या अग्र्यातील सुटकेशी केली.
मंगलप्रभात लोढा काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब बादशाहने आग्र्यात कैद करुन ठेवलं होतं. परंतु शिवरायांनी स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी
बादशाहच्या हातावर तुरी देऊन अतिशय चतुराईने तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे भरपूर प्रयत्न झाले. पण एकनाथ शिंदे हे देखील महाराष्ट्रासाठी तिकडून (शिवसेना, मविआ) बाहेर पडले”, असं म्हणत मंगलप्रभात लोढा यांनी सेना-मविआची तुलना औरंगजेबाशी तर एकनाथ शिंदे यांची तुलना शिवरायांशी केली.
महाराजांचा वारंवार अपमान हा भाजपचा एककलमी कार्यक्रम : आदित्य ठाकरे
“भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हे वक्तव्य चुकून आलेलं आहे किंवा भाषणाच्या ओघात त्यांनी अशी तुलना केली, असं मी मानत नाही. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे. भाजपचा हा एक प्लॅन आहे. महाराजांचा अपमान हा भारतीय जनता पक्षाचा एककलमी कार्यक्रम झालेला आहे, अशा शब्दात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार तोफ डागली.
शिवरायांच्या इतिहासाची मंगलप्रभात लोढांना किती माहिती? : अमोल मिटकरी
“मंगलप्रभात लोढा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काही संबंध असेल, असं मला वाटत नाही. त्यांच्याकडे जरी पर्यटन खातं असलं तरी त्यांना शिवरायांच्या इतिहासाबाबत कितपत माहिती आहे? हा अभ्यासाचा विषय आहे. त्यांना इतिहासाची जाण असेल किंवा त्याची बुद्धी असेल, असं मला वाटत नाही. शिवरायांनी बादशाहच्या हातावर तुरी दिल्या अन् आपली सुटका करुन घेतली, हे महाराजांचं कौशल्य होतं. महाराजांनी गद्दारी केली नव्हती. महाराजांनी स्वराज्य वाचविण्यासाठी केलेलं ते नियोजन होतं. या घटनेची तुलना शिंदेंच्या बंडाशी करणार असाल तर हे बुद्धी नसल्याचं लक्षण आहे”, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.