नागरगोजे कुटुंब हे रोहतवाडी इथे वास्तव्य करतं. काही वर्ष सुखाचा संसार चालला आणि नागरगोजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. डॉक्टर महेश नागरगोजे अकरा वर्षांचे असतानाच त्यांच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरवलं. १९९० साली महादेव नागरगोजे यांचं निधन झालं. निधनानंतर त्यांच्या पत्नी यांच्या पदरी दोन मुलं महेश आणि विजय यांचं पुढील संगोपन कसं करणार, पुढील आयुष्य कसं करायचं आणि कसं जगायचं हीच विवंचना समोर होती.
मात्र हार न मानता त्या हिमतीने पुढे जात होत्या. त्यांच्या संघर्षमय जीवनात अनेक कामं केली. लोकांची जनावरं सांभाळणं, तसंच स्वत:ची दोन एकरची शेती देखील त्या मोठ्या शिताफिने सांभाळत होत्या. काम करत करत मुलांचं शिक्षणही चालू होतं.
याचबरोबर त्या शालेय पोषण आहारातील खिचडी बनवण्याचं कामही करत होत्या. हे सगळं करत महेश यांच्या आईने आपल्या दोन्हीही मुलांचं संघर्षातून शिक्षण पूर्ण केलं. त्यांची दोन्ही मुलंही तितकीच हुशार निघाली. महेश यांचं शिक्षण हे रोहतवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच झालं. पुढे भाऊ थोडा कमवता झाल्याने महेश यांच्याकडे शिक्षणाबाबतीत जास्त लक्ष देण्यात आलं. दहावीच्या शिक्षणानंतर पाटोदा येथे पुढील शिक्षण पूर्ण करत महेश यांनी देखील आपल्या शिक्षणाचा संघर्षमय प्रवास सुरू केला होता.
आज महेश यांना एक कोटी सत्तर लाखांची शिष्यवृत्ती मिळाली असून ते इटलीत मेंदू विकारावर संशोधन करणार आहेत. जगभरात प्रसिद्ध असणारी डॉ मेरी क्युरी यांच्या नावाने संशोधनासाठी दिली जाणारी शिष्यवृत्ती ही बीडच्या रोहतवाडी येथील राहणाऱ्या डॉक्टर महेश नागरगोजे यांना जाहीर झाली आहे.
महेश हे याआधी एससीटीएमएसटी त्रिवेंद्र, केरळ येथे न्यूरोलॉजी विभागात ब्रेन स्टॉक विषयावर संशोधन करत आहेत. आतापर्यंत डॉक्टर महेश यांचे तीन संशोधक प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. मात्र आता यानंतर आईच्या कष्टाचं महेश यांनी चीज केलं आहे. महेश यांच्या मोठ्या भावाचंही उच्च शिक्षण असल्याने महेशच्या शिक्षणासाठी त्यांनी देखील मोठी मदत केली. मात्र महेशच्या यशानंतर रोहतवाडी गावासह बीड जिल्ह्यात डॉक्टर महेश नागरगोजे यांचं कौतुक केला जात आहे.
कष्टाने आईने दोन मुलांचं संगोपन करत त्यांना उच्च शिक्षण दिलं आणि आज मुलांनीही त्यांच चीज केलं आहे. ही एक कोटी सत्तर लाखाची शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी डॉक्टर महेश नागरगोजे यांना मिळाली आहे. यानंतर इटलीत ते पुढील संशोधनासाठी ते रवाना होणार असल्याची माहिती देखील महेश यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना दिली आहे