परळी येथील वैद्यनाथ मंदिर प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांमध्ये परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं स्थान जागृत समजलं जातं. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री यांनी बांधलं असल्याचं म्हटलं जातं. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचं आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या आणि भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेणारी ठिकाणं आहेत.
मंदिराचा गाभारा आणि सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचं दर्शन होऊ शकतं. इतरत्र कुठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येतं. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडं आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी इथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ किमी अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० किमी अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैद्यनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. या जागृत स्थानावर अनेक भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात.
परळी वैजनाथच्या दरबारी दरवर्षी लाखो भाविक मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात. रोज या मंदिरात हजारो भाविक प्रभू वैद्यनाथाचं दर्शन घेतात. शिवरात्रीला मंदिरात विशेष सजावट केली जाते. अनेक भाविक देश विदेशातून देखील या ठिकाणी या मंदिरात दर्शन करण्यासाठी तसंच या मंदिराचं वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी येत असतात. सध्या या मंदिराचं भव्यकरण करण्यासाठी अनेक प्रस्ताव देखील शासन दरबारी गेलेले आहेत. अनन्य साधारण महत्व असलेलं हे वैद्यनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगमध्ये येत असून बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात हे मंदिर आहे.