ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी सातारा हे त्यांचं होम पीच आहे. यामुळे या ठिकाणी शिंदे गटाला टक्कर द्यायची असेल, तर समोरचा शिवसैनिक तेवढ्याच तोडीचा हवा, हे उद्धव ठाकरे यांनी ओळखलं. त्यामुळे नितीन बानुगडे यांना बाजुला करत सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून शेखर गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे गटात नवचैतन्य निर्माण झाल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदे गटाला टक्कर द्यायची असेल तर शेखर गोरे यांच्यासारखा चांगला पर्याय असू शकत नाही, ही मागणी लक्षात घेत उद्धव ठाकरे यांनी ही खेळी खेळली. शेखर गोरे यांची सातारा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शेखर गोरे यांच्यात जिल्ह्यातील कोणत्याही बड्या नेत्याला शिंगावर घेण्याची ताकद आहे आणि हीच ताकद ओळखत हा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे शेखर गोरे हे भाजप आमदार जयकुमार गोरे यांचे बंधू आहेत. माण तालुक्यात दोघांमध्ये प्रचंड मोठा राजकीय संघर्ष कायम पाहायला मिळतो. मात्र शेखर गोरेंना मिळालेल्या या संधीमुळे त्यांना तालुक्यातील राजकारणात याचा फायदा होणार असल्याचं पाहायला मिळतंय.
हेही वाचा : मंदिर बांधलं भागोजीशेठ कीर यांनी, चित्रा वाघ यांनी नाव जोडलं सावरकरांचं, रत्नागिरीकर म्हणतात, ‘माफी मागा’
शेखर गोरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीआधी थेट शरद पवारांच्या भाषणाच्या स्टेजवर जात उमेदवारीला विरोध करत राज्यात रान पेटवून दिलं होतं. याच कारणामुळे अखेर शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत माघार घ्यावी लागली होती. भाजपा, वा एकनाथ शिंदे गट यांच्यासोबत राजकीय डाव पेच आणि रस्त्यावरचा संघर्ष करण्यासाठी जिल्ह्यात फक्त शेखर गोरे यांचाच पर्याय शिल्लक असल्याचं चित्र आहे. याचाच फायदा घेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला शह देण्यासाठी शेखर गोरेंच्या रुपानं मोठा सरदार मैदानात उतरवल्याच्या चर्चा आहेत.
हेही वाचा : काँग्रेस आमदार विक्रम सावंत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
आता याचा फायदा उठवत एकनाथ शिंदे गटातील नाराजांना उद्धव ठाकरे गटात स्वगृही घेऊन जाण्याचं आणि पुन्हा उद्धव ठाकरे यांचं पारडं सातारा जिल्ह्यात जड करण्याचं शिवधनुष्य शेखर गोरे कसं पेलतात, हे पाहावं लागणार असलं तरी मात्र शेखर गोरेंच्या रुपानं उद्धव ठाकरे यांनी खेळलेला डाव हा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाचा मानला जातोय. एकनाथ शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि उद्धव ठाकरेंनी शेखर गोरेंना दिलेलं सातारा जिल्हा संपर्क प्रमुख पद हे भविष्यातील राजकारणात अनेक उलथापालथी घडवणार हे मात्र नक्की.
हेही वाचा : पुण्यात रिक्षा संघटनेचे पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला, बाइक टॅक्सीवर कारवाईची मागणी