मुलाचे परिश्रम पाहून वडिलांनी सोडली दारू
उन्हाळ्यात विकल्या जाणारा बर्फाचा गोळा बनवून तो विकण्यावर आकाशने लक्ष केंद्रित केले. त्याने कल्पकतेने जवळपास ४५ प्रकारचे गोळ्याचे प्रकार तयार केले. ते विकून त्याने आज बीड जिल्ह्यात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपला मुलगा करत असलेली प्रचंड मेहनत आणि त्याला मिळालेल्या ओळखीमुळे दारूच्या आहारी गेलेल्या त्याच्या जन्मदात्या वडिलांनीच दारू सोडली आहे. याचे आकाशला मोठे समाधान आहे. मी गीतकार झालो नाही तर ठीक आहे, मात्र माझ्या वडिलांनी दारू सोडली ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. यामुळे आज आई देखील खूप आनंदी आहे.
आकाश वर्षभरात करतो अनेक व्यवसाय
आकाशने कल्पकतेने आपल्या व्यावसायाला वेगळं रूप दिलं. त्याने आपला एक लहान भाऊ आणि कटुंबीयांना एकत्रित करत एक व्यवसाय उभा करत वेगळं जग निर्माण केलं. या व्यवसायासोबत आकाशने अनेक व्यवसाय सुरू केले. प्रत्येक सणवारानुसार प्रत्येक ऋतूनुसार आकाशने अनेक व्यवसाय करायला सुरुवात केली. गणपती उत्सवात गणेश मूर्ती तयार करणे, दिवाळीमध्ये पणत्या तयार करणे, तर राखी पौर्णिमेला राख्या विक्रीचा व्यवसाय आकाश करत आहे.
बर्फाच्या गोळ्याचा व्यावसाय शेवटपर्यंत करणार
मात्र गोळा व्यवसाय हा शेवटपर्यंत करणार असल्याचं आकाश म्हणतो. कारण हा बर्फाचा गोळा आकाशला महिना काठी ४० ते ५० हजार रुपये मिळून देता. तसेच या व्यवसायामुळेच आकाश इतर व्यवसाय करू शकला आहे. आकाशचा गोळा आज बीडकरांमध्ये चवीने खाल्ल्या जाणारा आहे. यामुळे आकाशचे नागरिक कौतुक करतात.
एकीकडे आपल्या मेहनतीच्या काळात वडिलांनी आईला मोठ्या श्रीमंतीत ठेवलं होतं. त्यानंतर व्यवसायात थोड्याफार प्रमाणात नुकसान झाल्याने वडिलांनी दारू जवळ केली आणि या दारूमुळे श्रीमंतीतला आणि सुखा समाधानातला संसार हा हळूहळू दुःखात लोटला गेला. दारूसाठी खिशातला बँकेतला सगळा पैसा उडवत असलेले वडील आकाशने डोळ्याने पाहिले. आकाशने ही विदारक परिस्थिती आपल्या गायनाच्या जोरावर बदलण्याचा प्रयत्न केला. मात्र इंडियन आयडलच्या तिसऱ्या फेरीपर्यंत जात असताना घरी पुन्हा एकदा दारूच्या आहारी गेलेल्या वडिलांनी विदारक परिस्थिती निर्माण केल्याने आकाशला परत यावं लागलं आणि यानंतर आकाशचा खरा संघर्ष सुरू झाला.
या संघर्षात आकाशने घर तर सांभाळलंच, मात्र आज गोळ्याचा व्यवसाय करत करत तो अनेक व्यवसाय करतोय. त्याचबरोबर आपली संगीताची आवड ही ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतोय. वडिलांनीही दारू प्यायचं सोडून देत ते आकाशच्या व्यावसायाला हातभार लावत आहेत. हे आकाश साठी खूप कौतुकास्पद आहे. आकाशने जे केलं ते कौतुकास्पद आणि इतरांसाठी आदर्शवत असंच आहे.