यावेळी बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती दिली. फडणवीस म्हणाले, हजारे आणि पवार यांच्या प्रेरणेतून सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना मधल्या काळात राजकारणामुळे बंद पडली होती. आता ती पुन्हा सुरू करीत आहोत. हजारे यांची खूप दिवस प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. फोनवर बोलणे होत असे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची भेट होणार असल्याने आपण येथे आलो. हजारे यांच्या विचारांतील गाळमुक्त धरण आणि गाळयुत्त शिवार ही योजना राबविण्यात येणार आहे. यातून धरणांतील गाळ काढला जाऊन पाण्याची साठवण क्षमता वाढेल आणि तोच गाळ शिवारात आल्याने उत्पादन वाढीस मदत होईल. यातून गावे जलस्वयंपूर्ण करण्याचा मानस आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.
पशुधनाचे महत्व सांगताना फडणवीस म्हणाले, आपल्या संस्कृतीत गायीची पूजा केली जाते, गाईला माता मानले जाते. सुरवातीला यावर जगातील काही मंडळी हसत होती. आता मात्र हे सर्वांनी मान्य केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पशुधन आवश्यक आहे. शेती आणि पशुखाद्य क्षेत्रातही नैसर्गिक उत्पादने आणि दर्जा यावर भर दिला पाहिजे. पशुखाद्य क्षेत्रात हे काम यशस्वी होण्यासाठी आवश्यक ती प्रचार-प्रसार मोहीम राबविण्यास सरकार तयार आहे. मच्छिंद्र लंके आणि सुरेश पठारे यांच्यासारख्या उद्योजकांनी पुढाकार घेतला तर सरकार नक्कीच या क्षेत्रात काम करायला तयार आहे. रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन नैसर्गिक शेतीला चालना मिळाली तर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होऊन नफाही वाढेल. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविताना या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे. राळेगणसिद्धी येथून सौर कृषीपंप फीडर योजना सुरू झाली. ती कमालीची यशस्वी झाली आहे. त्यामुळे त्याचा पुढचा टप्पा आता सुरू करीत आहोत. त्यातून शेतकऱ्यांना स्वस्तात आणि दिवसाही वीज मिळण्यास मदत होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.