Chhatrapati Sambhajinagar News LIVE: विकास आराखड्यासाठी जुनी टीम सक्रिय, थेट मंत्रालयपर्यंत फिल्डिंग

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: शहराच्या विकास आराखड्यासाठी ‘जुनी टीम’ सक्रीय झाल्याची चर्चा आहे. या टीमने थेट मंत्रालयापर्यंत फिल्डींग लावल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे विकास आराखड्याचे ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ असे होणार का अशी भीती व्यक्त केली जात आहे.

विकास आरखड्यासंबंधीच्या अवमान याचिकेसंदर्भात आदेश देताना उच्च न्यायालयाने सरकारच्या अधिकाऱ्याकडून विकास आराखड्याचे काम करून घेण्याचे सांगितले आहे. तीन आठवड्यांत अधिकारी नियुक्त करा असे शासनाला बजावले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर विकास आराखड्यासाठी ‘जुनी टीम’ सक्रीय झाल्याची चर्चा पालिकेसह विकास आराखड्याशी संबंधित विविध घटकांमध्ये सुरू झाली आहे.

सन २०१४ – १५ मध्ये शहराच्या विस्तारित भागाचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा प्रसिद्ध करण्यास व शासनाला सादर करण्यास तत्कालीन पालिका आयुक्तांची सहमती नव्हती. त्यांच्या सहमतीशिवाय महापौरांनी आराखडा सादर केला. त्यामुळे आराखडा वादाच्या भोवऱ्यात सापडला. डीपी युनिटने तयार केलेल्या आराखड्यात मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यासाठी पालिकेच्या त्यावेळच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. आराखड्यातील बदलासाठी तारांकित हॉटेलमध्ये बैठका झाल्याची देखील त्यावेळी चर्चा होती. आराखड्यात करण्यात येत असलेल्या बदलाला विरोध देखील झाला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वोच्च न्यायालयाने तो आराखडा रद्द ठरवत मुळ शहर आणि विस्तारित शहर याचा एकत्रित विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शासनाने डीपी युनिट तयार करून पालिकेच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम सुरू केले. याबद्दल अवमान याचिका दाखल झाल्यावर शासनाच्या स्तरावर आराखड्याचे काम करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले व त्यासाठी अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले.

उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर विकास आराखड्यासाठीची ‘जुनी टीम’ सक्रीय झाल्याचे बोलले जात आहे. ‘आपल्याला पूरक’ ठरेल अशा अधिकाऱ्याची नियुक्ती केली जावी यासाठी या टीमने मंत्रालयात फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. एका कार्यक्रमासाठी मंत्रालयातील एक वरिष्ठ अधिकारी काही दिवसांपूर्वी शहरात आले होते, यावेळी त्या टीमच्या काही सदस्यांनी त्या अधिकाऱ्याची भेट घेतल्याचे देखील बोलले जात आहे. विकास आराखड्यासाठी ‘जुनी टीम’ सक्रीय करण्यात पालिकेतील काही अधिकाऱ्यांनी देखील पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे.

शहराने मारली बाजी

छत्रपती संभाजीनगर शहराचा मुळ, विस्तारित असा एकत्रित विकास आराखडा तयार करण्यासाठी डीपी युनिट तयार करण्यात आले, या युनिटने पीएलयू (प्रस्तावित जमीन वापर नकाशा) तयार करुन तो शासनाला सादर केला आहे. हा नकाशा सादर करण्यात शहराने बाजी मारली आहे. अवघ्या दोन वर्षात पीएलयू तयार करण्यात आला आहे. ठाणे, नागपूर, कोल्हापूर, पिंप्रीचिंचवड, अकोला या शहराच्या विकास आराखड्यासाठी तयार करण्यात आलेल्या डीपी युनिटचे काम प्राथमिकस्तरावर आहे,तर ठाणे आणि पिंप्रीचिंचवडच्या डीपी युनिटने अस्तित्वातील जमीन वापर नकाशा (इएलयू) सादर केल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हा उपनिबंधक जाळ्यात

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्यात विशेष तपास पथकाला मोठे यश आले आहे. या प्रकरणात एसआयटीने जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना नाशिक येथून ताब्यात घेतले आहे. सतीश खरे २०१६ ते २०१८ दरम्यान जिल्हा उपनिबंधक म्हणून शहरात कार्यरत होते. सतीश खरे यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आला असता, त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या प्रकरणात ‘एसआयटी’ने दिलेल्या माहितीनुसार, आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेविरोधात २०२ कोटी २४ लाख ६३ हजार ९६० रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपासासाठी पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. सध्या विशेष तपास पथकाच्या माध्यमातून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सतीश खरे यांना मंगळवारी (२९ ऑगस्ट) अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची म्हणजे चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सतीश खरे २०१६ ते २०१८ या काळात जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. सतीश खरे यांनी या काळात आदर्श नागरी पतसंस्थेच्या आर्थिक ताळेबंदीच्या आधारावर देण्यात आलेल्या लेखापरीक्षणाच्या अहवालावर तत्कालीन उपनिबंधकांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. या काळातच आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग होता. त्यांनी त्या वेळी कोणती कारवाई केली, या अनुषंगाने तपास केला जात आहे. या गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाचे पोलिस निरीक्षक एस. बी. पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.

कचकुरे आणि सुनील पाटीलला पुन्हा अटक

या आर्थिक घोटाळा प्रकरणात हर्सूल कारागृहातील आरोपी नामदेव दादाराव कचकुरे (वय ४८, रा. शेंद्र कमंगर) आणि आरोपी सुनील अंबादासराव पाटील (वय ५१, रा. एन-६, सिडको) यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न होत असल्याने दोन्ही आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा ताब्यात घेऊन त्यांची पोलिस कोठडी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

बहिणीच्या घरी भावाची आत्महत्या

वडगाव कोल्हाटी येथील छत्रपतीनगरमध्ये बहिणीच्या घरी राहणाऱ्या एका तीस वर्षांच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. आकाश सर्जेराव शिंदे (वय ३०, रा. वडगाव कोल्हाटी, ता. छत्रपती संभाजीनगर, मूळ रा. खैरका, ता. मुखेड, जि. नांदेड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने बहिणीच्या घरी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोविंद गोंधळे आणि सुनंदा गोंधळे हे दाम्पत्य महादेव वाघमारे यांच्या घरात किरायाने राहतात. त्यांच्यासोबत सुनंदा यांचा भाऊ आकाशसुद्धा राहत होता. हे तिघेही एमआयडीसीतील कंपनीत कामाला आहेत. गोविंद व सुनंदा गोंधळे दोघेही बुधवारी कंपनीत कामाला गेले होते. त्या वेळी आकाश घरीच होता. दुपारी चारच्या सुमारास सुनंदा घरी आल्या असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी आकाशला दरवाजा उघडण्यासाठी आवाज दिला. मात्र, तरीही आकाश दरवाजा उघडत नसल्याने सुनंदा यांनी खिडकीतून घरात पाहिले. त्या वेळी आकाश यांनी गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. हे पाहताच सुनंदा यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेजारी जमा झाले. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या वेळी उपनिरीक्षक सचिन पागोटे, अंमलदार युसूफ शेख, किशोर गाडे, स्वप्नील अवसरमल, गणेश सागरे; तसेच सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन यांनी घटनास्थळी जाऊन आकाशला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी आकाश यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अंमलदार बावसकर करीत आहेत.

आकाश यांच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे; तसेच तो काही दिवसांपासून लग्नाचा विचार करीत होता. त्यामुळे नेहमी तणावात राहत होता. आत्महत्येपूर्वी आकाशने ‘आज माझा शेवटचा दिवस आहे. मरणालाही नशीब लागते. आईचा सांभाळ कर. ताई मला माफ कर,’ असे चिठ्ठीत लिहिले आहे. आत्महत्या करताना बाजूलाच मोबाइलचा कॅमेरा चालू करून ठेवला असल्याने त्यामध्ये चित्रीकरण केले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या घरी भावाने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Source link

By jaghit