भाजप गवताला चिबुक काटा या नावानेही ओळखतात. हे एक विदेशी गवत आहे. मात्र, ते भारतात कसे आले याविषयी संशोधनाची गरज असल्याचे, अभ्यासक सोमिनाथ घोळवे यांनी म्हटलं आहे. भाजप गवत काय आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय त्रास सहन करावा लागतो याबाबत सविस्तर माहिती पाहूयात.
भाजप गवत हे परदेशी गवत आहे. अल्टरनेनथेरा चेसेलिज असं शास्त्रीय नावाने या गवताला परदेशात ओळखले जाते. मात्र, भारतात या गवताला भाजप गवत हे नाव पडलं आहे. जवळपास ८०च्या दशकात हे गवत भारतात आल्याचा अंदाज आहे. देशात भाजपचा प्रसार आणि या नव्या गवताचा प्रसार समकालीन असल्याने याला भाजप गवत असं नाव पडलं. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील शेतकरी या गवताला भाजप गवत याच नावाने ओळखतात. शेतीच्या बांधावर, शेतात आणि मोकळ्या जागेवर या गवताची वाढ होते, असं निरीक्षण सोमिनाथ घोळवे यांनी नोंदवले आहे.वाचाः शेवटच्या घटका मोजत असताना महिलेने मुंबईच्या मुलीला दिले नवे आयुष्य, तरुणीच्या वाढदिवशीच…
शेतकऱ्यांना भाजप गवताचा त्रास
अहमदनगर, शेगाव, पाथर्डी, शिरुर कासार, बीड, केज, जामखेड, आष्टी या जिल्ह्यात शेतीच्या बांधावर तसेच थेट शेतातच या गवताचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या गवताच्या वाढीचा वेग जास्त आहे. काँग्रेस गवत आणि भाजप गवत यात कमालीचा फरक आहे. काँग्रेस गवत कमी होऊन भाजप गवत वाढले असल्याचे काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या गवताला प्रत्येक काड्यांवर बारीक अणुकुचीदार काटे असल्याने शेतकरी “चिमुक काटा” असेही म्हणतात. या गवताच्या वाढीचा वेग वाढला असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. अनेक शेतकरी तणनाशक फवारणीचा वापर करून या गवताला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे गवत मरत नाही. या गवताचे पूर्ण आयुष्य झाल्यानंतर (वाळल्यावर) पेटवून देण्याशिवाय शेतकऱ्यांकडे काहीच पर्याय राहत नाही. गवताला आग लावून जाळले तरी पाऊस पडला की नव्याने उगवून येते. तसेच वेगाने वाढ देखील होते.
भाजप गवत हे शेतातदेखील वाढत आहे. तसंच, गवताला काटे असल्याने गवत काढताना त्रास होतो. शेतात गवत फोफावत गेल्याने पिकं उद्ध्वस्त होतात आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. हे गवत कोवळं असतानाच शेतातून काढण्यात यावे, असा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात येतो.
भाजप गवताचा फैलाव कुठे होतो
अतिवृष्टीने गावोगावच्या मोकळ्या जागेवर भाजप गवताचा फैलाव वाढला आहे. विशेषतः बागायती परिसरात या गवताची वाढ वेगाने होताना दिसून येते. पाणवठ्याच्या जागी हे गवत जोमाने वाढते, असं सोमिनाथ घोळवे यांनी म्हटलं आहे.
भाजप गवताचे वैशिष्ट्ये
भाजप गवताचे वैशिष्ट्ये असे की, यंदाच्या चालू वर्षात या गवताचे उदंड असे पीक आले आहे. गवत कोवळे असताना त्याला हिरवेगार पालवी असणारे आणि लसलसीत दिसते. जनावरेदेखील आवडीने-चवीने खातात. पण हे गवत जसे परिपक्व अवस्थेकडे जाते. त्यावेळी जनावरांच्या नाकाला काटे टोचू लागतात. त्यामुळे परिपक्व झालेले हे गवत जनावरे खात नाहीत.
वाचाः मुलींना मिळणार मोठा दिलासा; आता मासिक पाळीदरम्यान विद्यार्थिनींना मिळणार रजा
गवत कोवळे असताना जनावरांच्या चाऱ्यामुळे शेतकऱ्यांना चांगले वाटते. पण परिपक्व झाले की त्रास होतो. या गवतामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट, खनिज याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होत असल्याचे, काही शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, या गवतावर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे.नाहीतर भविष्यात शेतकऱ्यांना खूप त्रास देणारे गवत म्हणून उदयाला येईल, असा अंदाज शेतकरी सांगतात.
काँग्रेस गवत म्हणजे काय?
सुमारे ४० ते ४५ वर्षांपूर्वी अमेरिकेतून गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आले. नंतर ते मोठ्या प्रमाणावर फोफावले त्या गवतास ‘काँग्रेस गवत’ असे म्हटले गेले.