एका ऑटो रिक्षामध्ये ५ सीटर पेक्षा कमी प्रवासी वाहून न्यायचा परवाना असतोय. तरीही अशा परिस्थितीत ऑटो चालक जीव धोक्यात घालून समोर चार ते पाच विद्यार्थी बसवून तसेच काही विद्यार्थी उभे ठेवून म्हणजेच लटकून प्रवास करताना दिसून येतात. अकोल्याचा व्हायरल होत असलेला व्हिडिओ हेच सांगून जातोय. या वाहनात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी प्रवासी प्रवास करत असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आलं आहे. या ऑटो रिक्षामध्ये तब्बल १५ ते २० शालेय विद्यार्थी असल्याचे समजते. तरीही व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने यासंदर्भात ऑटो चालकाला हटकले असता त्याने त्यावर स्माईल केली आणि विषय सोडून दिला. शालेय विद्यार्थ्यांकडून मात्र आम्ही ३५ विद्यार्थी आहोत, असे सांगण्यात आलं. या व्हिडिओमध्ये मात्र पंधराच्या जवळपास विद्यार्थी असल्याचं दिसून येत आहे.
ऑटो रिक्षा, स्कुल बससह छोट्या-मोठ्या कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याचे प्रमाण आता वाढले आहे. याचाच फायदा घेत अकोला शहरात अनेक ठिकाणी ऑटो रिक्षा चालक बेकायदा शालेय विद्यार्थी वाहतूक करीत आहे. क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक रिक्षामधून होत असल्याने हा प्रवास जीवघेणा ठरतोय. त्यात वायरल होत असलेल्या व्हिडिओद्वारे स्पष्टच समजते की शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे अशी वाहतूक करणाऱ्यांकडून अनेकदा सुरक्षिततेविषयक खबरदारी घेतली जात नाही. यामुळे अनेकदा अपघातही घडले आहेत.