या लाँग मार्चमध्ये आदिवासी भागातील हजारो शेतकरी वृद्ध महिला सहभागी झाल्या असून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. लॉंग मार्च हा मुंबईच्या दिशेने वाटचाल करत असताना मोर्चामध्ये सहभागी झालेल्या एका आंदोलक महिलेची तब्येत अचानक बिघडली. त्या महिलेच्या पोटात अचानक दुखू लागल्याने तिला ॲम्ब्युलन्समधून नाशिककडे रवाना करण्यात आलं आहे.
सलग तीन दिवसांपासून आंदोलक पायी चालत आहेत. अनेकांच्या पायांना अक्षरश: फोड आले आहेत. तर काहींच्या पायांच्या टाचा तर रक्ताने माखलेल्या आहेत. शेतकरी मोर्चेकरांचं हे दृश्य पाहून सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणि अंगाला काटा आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या आंदोलनात सहभागी असलेल्या कष्टकरी बांधवांच्या आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होताना दिसत आहेत.
या आंदोलनात आंदोलकांसाठी आरोग्यसेवा तत्पर असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनात सेवा असल्याने अशा काही अडचणी निर्माण झाल्यास तत्परतेने रुग्णवाहिका उपलब्ध आहे. त्यामुळे संबंधित ही महिला आजारी पडल्याने त्वरित रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी तिला रुग्णालयात हलवण्यात आले.
महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी सरकार बदललं. मात्र, आजही सामान्य नागरिक शेतकरी आपल्या प्रश्नासाठी झगडत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. इकडे लाल वादळाने एकत्र येत पुन्हा सरकाराला घाम फोडण्यासाठी लाँग मार्चचं आयोजन केले. विशेष गोष्ट म्हणजे एक ८ वर्षांचा चिमुरडा या मोर्चात आपल्या बापासोबत सामील झाला आहे.
त्यानुसार मागील ४८ तासांपासून हजारो शेतकरी लाँग मार्चच्या माध्यमातून पायी चालत आहेत. दिंडोरी येथून निघालेल्या पायी लाँग मार्च काल शहरातील जवळील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील मुक्कामानंतर नाशिक शहरातून पुढे निघाला. आता हा मोर्चा घोटी शहरानजीक असून आतापर्यंत या मोर्चाने जवळपास ६६ किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.
नितेश राणे आणि अबू आझमी यांच्यामध्ये विधीमंडळ परिसरात खडाजंगी