मध्य प्रदेशच्या सीमेलगत मलगावजवळील (ता. शहादा) पिपल्यापाडा येथे एकाच कुटुंबातील दोन गटांत शेतजमिनीचा वाद होता. त्यावरून दोन्ही गटांत शेतातच हाणामारी झाली. हाणामारीत तलवारी, विळा, लाकडी दांडके आदी हत्यारांचा वापर करण्यात आला. हाणामारी एवढ्यावरच न थांबता थेट गावठी पिस्तुलातून दोन फैरी झाडण्यात आल्या.
गोळीबारात अविनाश सुकराम खर्डे (वय २६, रा. मलगाव, ता. शहादा) जागीच ठार झाला, तर त्याचे काका रायसिंग कलजी खडे (५४) यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. सुकराम कलनी खर्डे (वय ४२), गणेश दिवाण खर्डे (२४), रामीबाई दिवाण खडें (सर्व रा. मलगाव, ता. शहादा), सुनील राजेंद्र पावरा (२३), अरुण राजेंद्र पावरा (दोघे रा. बेडिया, ता. पानसेमल, मध्य प्रदेश) आदी पाच जणांचा जखमीमध्ये समावेश आहे.
यात अविनाश खर्डे यांचे वडील सुकराम यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेत १४ आरोपींचा समावेश असून, शहादा पोलिसात देवेसिंग रायसिंग खर्डे व सोनीबाई गणेश खर्डे यांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखला केल्या आहेत.