uddhav thackeray camp, Andheri Bypoll: शिंदे गटात जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा; निर्णायक क्षणी ठाकरे गटाला मोठा बुस्टर - andheri bypoll results shivsena shakha network is still alive and backing uddhav thackeray

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर झाली. यामध्ये ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांनी मशाल या नव्या पक्षचिन्हावर दणदणीत विजय मिळवला. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांना ६६,५३० मतं मिळाली. ही मतं २०१९ मध्ये रमेश लटके यांना मिळालेल्या मतांपेक्षाही अधिक आहेत. त्यामुळे वरवर अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll) ही एकतर्फी वाटत असली तरी यामधून अनेक महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिका पुन्हा जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या ठाकरे गटासाठी अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालातील सुप्त संदेश हे अनुकूल असे आहेत.

अंधेरी पोटनिवडणुकीतील विजयाचे शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी विश्लेषण केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या पोटनिवडणुकीने दाखवून दिले की, शिवसेनेतील फुटीनंतरही पक्षातील शाखांचे जाळे अद्याप अबाधित आहे. विशेष म्हणजे आमदार आणि बडे नेते शिंदे गटात गेले असले तरी मुंबईतील सामान्य शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी असल्याचे निकालातून दिसून येते. मात्र, राजकीय जाणकारांच्या मतानुसार, ही पोटनिवडणूक महाविकासआघाडीने एकत्र लढवली असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं किती प्रमाणात ऋतुजा लटके यांना मिळाली, याबाबत अद्याप साशंकताच आहे.

मात्र, मुंबईतील सामान्य शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभा असल्याचा निष्कर्ष ठाकरे गटाकडून काढला जात आहे. शिंदे गट भाजपसोबत सत्तेत जाऊन बसल्यामुळे मुंबईत शिवसेनेला खूप मोठा फटका बसेल, असा अंदाज अनेकजण व्यक्त करतात. मात्र, मुंबईतील ठाकरे घराण्याचे वर्चस्व अजूनही अबाधित असल्याचे अंधेरी पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांनी त्यांचे दिवंगत पती रमेश लटके यांच्यापेक्षा तब्बल ३५०० हजार जास्त मतं मिळवली आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शाखाप्रमुख या ग्राऊंड लेव्हलवरील यंत्रणेने चोखपणे कामगिरी बजावल्याचे सांगितले जात आहे. मात्र, नोटाला मिळालेली दुसऱ्या क्रमांकाची मते ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाही. भाजपच्या मुरजी पटेल यांनी ही पोटनिवडणूक लढवली असती तर नोटा फॅक्टरमुळे ऋतुजा लटके यांच्यासाठी ही लढाई अवघड ठरू शकली असती.
Andheri Bypoll: नोटाला जास्त मतं का पडली? ठाकरे गटाचे ‘चाणक्य’ अनिल परबांनी सांगितलं कारण
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अंधेरी पोटनिवडणूक एकत्र लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची किती मतं लटके यांना ट्रानस्फर झाली, याबाबत मोठी साशंकता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला २७ हजार मतं मिळाली होती. याची गोळाबेरीज केल्यास ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत ८० हजारापेक्षा जास्त मतं मिळायला हवी होती. मात्र, तसे घडले नाही. सांख्यिकी तज्ज्ञ असणाऱ्या हितेश जैन यांच्या मतानुसार, अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं नक्कीच ऋतुजा लटके यांना मिळाली आहेत. २०१९ च्या निवडणुकीत ५३ टक्के मतदान झाले होते. परंतु, पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४ टक्के मतदान झाले. मतदानाचा टक्का इतका कमी असूनही ऋतुला लटके यांनी रमेश लटके यांच्यापेक्षा जास्त मतं मिळवली आहेत. भाजपने पडद्यामागून नोटाची खेळी खेळली, ही शक्यता गृहित धरली तरी, नोटाला १२ हजाराच्या आसपास मतं मिळाली आहे. नोटाने २५ हजारापेक्षा जास्त मतं घेतली असती तर भाजपच्या रणनीतीची विजय झाला असा निष्कर्ष काढता आला असता, असे मत हितेश जैन यांनी व्यक्त केले.
Andheri Bypoll Results: सूनबाईंची विजयाच्या दिशेने घोडदौड, लेकाची आठवण काढत रमेश लटकेंचे वडील म्हणाले…

कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी, मुंबईतील पडझड थांबणार

भाजपच्या मुरजी पटेल यांनी अगदी शेवटच्या क्षणी अंधेरी पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. त्यानंतर ठाकरे गटाने मोठ्या सभा आणि रॅली काढण्याऐवजी सॉफ्ट कॅम्पेनिंगवर भर दिला. ऋतुजा लटके या सामान्य शिवसैनिकांसह घराघरापर्यंत जाऊन प्रचार करत होत्या. तर आदित्य ठाकरे हे अंधेरी पूर्व मतदारसंघात बैठका घेत होते. अनिल परबांनी आखलेली प्रचाराची ही रणनीती यशस्वी ठरली. अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल शिंदे गटात जाऊ इच्छिणाऱ्या मुंबईतील नगरसेवकांसाठी महत्त्वाचा इशारा आहे. या पोटनिवडणुकीच्या निकालाने ठाकरेंची मुंबईतील जादू अबाधित असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून शिंदे गटात इनकमिंग होण्याची शक्यता बऱ्याच अंशी कमी झाली आहे.

Source link

By jaghit