आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास प्रकारचं असणार आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच शहरांमधून हे सूर्यग्रहण दिसणार आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रमार्फत ग्रहण पाण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाचे क्रीडांगण येथे ग्रहण पाहण्यासाठी दुर्बीण, कॅमेरा आणि खास आवरण असलेले चष्म्यांद्वारे सर्वसामान्य पुणेकरांना ग्रहण पाहता येणार आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये येतो आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडते त्याला सूर्यग्रहण म्हटले जाते. त्यातही सूर्याचा काहीच भाग चंद्राकडून झाकला जातो तेव्हा ते खंडग्रास सूर्यग्रहण असते. एकीकडे हे ग्रहण पाहण्यासंदर्भात उत्सुकता असताना दुसरीकडे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही या ग्रहणाकडे पाहिलं जात आहे.
नक्की वाचा >> Surya Grahan 2022 Rashi Bhavishya: ‘या’ वेळी जन्मलेल्या लोकांनी ग्रहण पाहणे टाळावे; बसू शकतो मोठा आर्थिक फटका
या ग्रहण कालावधीमधील पुण्यकाळ कोणता यासंदर्भात दाते पंचांगामध्ये दिलेल्या माहितीनुसार, “हे सूर्यग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल, त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या स्पर्शकालापासून आपल्या गावाच्या सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा.”
ग्रहणाचा वेध
हे ग्रहण दिवसाच्या चौथ्या प्रहरात लागत असल्याने मंगळवारच्या पहाटे ३:३० पासून सूर्यास्तापर्यंत ग्रहणाचा वेध पाळावा असं दाते पंचांगात म्हटलं आहे. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी दुपारी १२:३० पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेधामध्ये स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी गोष्टी करता येतील. तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल. ग्रहण पर्वकाळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते सूर्यास्त या काळात (मुंबईसाठी दुपारी ४:४९ ते सायंकाळी ६:०८) पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत असा उल्लेख दाते पंचांगात आहे.
पाडवा साजरा करावा का?
या ग्रहणाचे वेध मंगळवारी पहाटेपासून आहे. मंगळवारी सूर्यास्तानंतर वेध संपत असल्याने बुधवारी पहाटे दिवाळी पाडव्यानिमित्त केले जाणारे वहीपूजन देखील परंपरेप्रमाणे करता येईल. पाडव्यानिमित्त केले जाणारे सर्व धार्मिक उत्सव परंपरेप्रमाणे करता येतील.
चार तास तीन मिनिटांचा ग्रहण कालावधी
ग्रहणाची सुरुवात २५ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजून २९ मिनिटांनी होईल. ग्रहण सायंकाळी सहा वाजून ३२ मिनिटांनी संपेल. म्हणजेच सूर्यग्रहणाचा संपूर्ण कालावधी चार तास तीन मिनिटांचा असेल. यापूर्वी असं २७ वर्षांआधी म्हणजेच १९९५ साली घडलं होतं जेव्हा दिवाळीमध्येच सूर्यग्रहण झालेलं.
८ नोव्हेंबरला चंद्रग्रहण
खंडग्रास सूर्यग्रहणानंतर १४ दिवसांनी मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही भारतातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे. यावर्षी दीपावलीमध्ये जरी सूर्यग्रहण येत असले तरी २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाच्या दिवशी कोणताही सण नाही. यामुळेच सूर्यग्रहण पाहण्याची नामी संधी मिळणार आहे.