काल रात्री दोन युवकांनी सोशल नेटवर्किंग साइटवर छत्रपती शिवाजी महाराज यांची औरंगजेबासोबत तुलना करणारा मजकूर टाकल्यामुळे शेवगाव शहरात तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते. संतप्त झालेल्या शिवभक्तांनी शेवगाव पोलीस ठाण्याच्या प्रांगणात मोठी गर्दी केली. आरोपींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करत रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला. आरोपींना अटक करा, तरच आम्ही येथून उठू, अशी भूमिका त्यांनी घेतली. नागरिकांचा संताप पाहता शेजारील तालुक्यातील पोलीस पथक येथे दाखल झाले. शेवगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यातील एक युवक अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
श्रीरामपुरचे उप विभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, नगरचे उप विभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सोनाईचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी पथकासह शेवगावमध्ये दाखल झाले. या प्रकरणी साईनाथ कचरदास आधाट (रा. माळीवाडा, शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर वातावरण निवळले. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक अल्पवयीन असल्याने त्याला समज देऊन नातेवईकांच्या ताब्यात आले आहे. तर दुसऱ्याला अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ उद्या सोमवारी शेवगावमध्ये बंद पुकारण्यात आला आहे. शहरातील सर्व शिव प्रेमी संघटनांकडून शेवगाव बंदची हाक देण्यात आल्याचे अविनाश देशमुख यांनी सांगितले. शहरातील सर्व व्यापारी बांधवानी सहकार्य करावे.
घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून क्रांती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. या दिवशी दहावीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांना तसेच मढी यात्रेला निघालेल्या भाविक-भक्तांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.