महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पाचही मतदारसंघातील मविआ उमेदवारांच्या विजयाबद्दलचा विश्वास व्यक्त करताना नाना पटोले यांनी भाजप आणि सत्यजीत तांबे यांच्यावर टीका केली. जगातील सगळ्यात मोठ्या पक्षाला नाशिक पदवीधरमध्ये उमेदवार मिळाला नाही. दुसऱ्यांची घरं फोडण्याचं पाप भाजप करत असल्याची घणाघाती टीका नाना पटोले यांनी केली.
कुठल्या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा?
नागपूर- सुधाकर अडबेले, अमरावती- धीरज लिंगाडे, औरंगाबाद- विक्रम काळे, नाशिक- शुभांगी पाटील आणि कोकण- बाळाराम पाटील या उमेदवारांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
सत्यजीत तांबे यांच्याविरोधात शुभांगी पाटील जिंकून येतील : नाना पटोले
डॉ. सुधीर तांबे आणि आता सत्यजीत तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध नाही. आम्हालाही त्यांचं देणंघेणं नाही. काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत यांच्याविरोधात शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. सत्यजीत तांबे यांच्याविरोधात त्या बहुमतांनी जिंकून येतील, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
सत्यजीत तांबे यांना काँग्रेसचा हिसका
सुधीर तांबे यांनी पक्षाविरोधी पाऊल उचलल्याने काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. त्या कारवाईनंतर सत्यजीत तांबे यांच्यावरही काँग्रेस कारवाई करणार का? याकडे सगळ्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर आज प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असल्याचं जाहीर केलं. आधी डॉ. सुधीर तांबे आणि आता सत्यजीत तांबे यांच्यावर कारवाई करुन नाना पटोले यांनी बापलेकाला काँग्रेसचा हिसका दाखवला आहे.