रत्नागिरी : समुद्राच्या पाण्यात जाऊन कोणतीही आवश्यक काळजी न घेता चुकीच्या पद्धतीने मौजमजा केल्यास ती जीवावर बेतण्याचा धोका असतो. असाच एक प्रकार रत्नागिरी जिल्ह्यात घडला आहे. समुद्राच्या पाण्यात बुडालेले दोन जण बचावले, तर अमिर मोहम्मद खान हा पाण्यात बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह अखेर तीन दिवसांनी मिळाला आहे. शहरातील मुरुगवाडा येथील पांढरा समुद्रात सोमवारी सायंकाळी ४ वाजता ही घटना घडली होती. या बेपत्ता तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी भाटीमिऱ्या येथे आढळून आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी पोहायला गेलेले तीन तरुण बुडाले होते. यातील दोघांना वाचवण्यात यश आले होते. एकजण बेपत्ता होता. तिघेही मूळचे बिहारचे राहणारे आहेत. ही दुर्दैवी घटना रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथे सोमवारी घडली होती. अमिर मोहम्मद खान (२२, मूळ रा. बिहार, सध्या रा. फिनोलेक्स कॉलनी, शेजारी रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील गणेश भक्तांसाठी महत्त्वाची बातमी, जिल्हाधिकाऱ्यांकडून मोठा निर्णय जाहीर
फिनोलेक्स कॉलनी शेजारी कोस्टगार्डच्या रहिवासी इमारतीचे काम सुरू आहे. याठिकाणी मजूर म्हणून कामाला असलेले अमिर मोहम्मद खान, त्याचा मित्र अर्जुन राजेंद्र रामकुमार (१९, मूळ रा. बिहार सध्या रा. फिनोलेक्स कॉलनी शेजारी, रत्नागिरी) आणि अमनराम हे तिघे सुट्टी असल्याने पांढरा समुद्र येथे फिरण्यासाठी गेले होते.
मद्यधुंद अवस्थेत हे तरुण समुद्राच्या पाण्यात सेल्फीसह व्हिडिओ चित्रीकरण करण्यात दंग झाले होते. एक तरुण मोबाईलवर चित्रीकरण करीत होता, तर दोघेजण समुद्रात लाटांवर उड्या मारत होते. त्यातील एकजण पाण्यात ओढला गेला आणि अचानक गायब झाला. तो बुडत असताना काही ग्रामस्थांनी दुरून पाहिले. मात्र, ते समुद्रकिनारी पोहोचेपर्यंत फार उशीर झाला होता. शोधाशोध केल्यानंतर अखेर बुधवारी त्याचा मृतदेह आढळून आला आहे.