pune bjp, अध्यक्ष बदलावा अन्यथा पुणे महापालिका निवडणूक जिंकणे अवघड, भाजपच्या नेत्याने व्यक्त केली भीती - remove jagdish mulik from the post of pune city bjp president demand bjp leader ujwal keskar

पुणे : पुण्यात आधीपासूनच भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी पहायला मिळत आली आहे. सुरवातीला शहराध्यक्ष निवडायचा झाल्यास गोपीनाथ मुंडे-नितीन गडकरी गटांत शीतयुद्ध चालायचं. नंतरच्या काळात शहराचं नेतृत्व कोणी करायचं यावरून गिरीश बापट आणि संजय काकडे यांच्यात वाद पाहायला मिळाला. तर आता पुन्हा एकदा गिरीश बापट यांना बाजूला करत पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी एकहाती शहर नेतृत्व मिळवलं आहे. पण असं असलं तरी आता भाजपमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळला आहे.

भाजप नेते आणि माजी नगरसेवक उज्वल केसकर यांनी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना पदावरून हटवावे, अशी जाहीर मागणी केली आहे. ‘पुणे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात बदल करणे आता गरजेचे आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे अथवा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांना अध्यक्ष केले पाहिजे, नेतृत्व बदल झाला नाही तर महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे अवघड आहे. जगदीश मुळीक यांना खासदारकी द्या आणि पुनर्वसन करा पण शहराध्यक्ष पद त्वरित बदलले पाहिजे सिद्धार्थ शिरोळे हा योग्य उमेदवार आहे.’ असं केसकर म्हणाले आहेत.

दरम्यान, वडगांव शेरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्याकडे भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आहे. गेल्या वर्षीपासून भाजप शहराध्यक्षपद बदलण्यात यावे, अशी मागणी सातत्याने काही कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. त्यातच माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांनी फेसबुक पोस्ट करत थेट शहराध्यक्ष बदलण्याची जाहीर मागणी केल्याने भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. यासंदर्भात आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.

Source link

By jaghit