पुण्याच्या कोंढवा परिसरातून अब्दुल कय्याम शेख आणि रझा खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघेही पीएफआय संघटनेचे पदाधिकारी आहेत. या संघटनेला जो निधी पुरवठा होतो, त्याचा उपयोग दहशतवादी कारवायांसाठी होतो का, याचा तपास केला जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि नवी मुंबईतील या धाडसत्रात एनआयए, ईडी, एटीएस आणि जीएसटी विभागाचेही अधिकारी सामील झाल्याची माहिती आहे. कोंढवा येथील कौसरबाग मशिदीजवळील कोंढवा येथील पीएफआयचे राज्य कार्यालय आहे.या कार्यालयावर ही छापेमारी सुरू आहे. तसेच छापा टाकून काही प्रिंटर प्रकारच्या वस्तू जप्त केल्या आहेत. पीएफआयचे नेते रझी अहमद खान यांच्या कोंढव्यातील घरावरही कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या (PFI) देशभरातील मालमत्तांवर छापे टाकले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. देशातील सुरक्षा यंत्रणांकडून गेल्या काही दिवसांपासून टेरर फंडिगप्रकरणाचा तपास केला जात आहे. या धाडसत्रामुळे या सगळ्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
कारवाईत एटीएस पथकही सहभागी
पहाटेपासून सुरु असलेल्या या छापेसत्रासंदर्भात एटीएसकडून माहिती देण्यात आलीआहे. आज पहाटेपासून एटीएसकडून औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईत परिसरात छापे टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीएफआय ही संघटना देशविघातक कारवाया आणि समाजात द्वेष पसरवत असल्याचा आरोप आहे. आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु असल्याचे एटीएसकडून सांगण्यात आले आहे.