नाशिक पदवीधरमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले असून या निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यापासून या निवडणुकीचे चित्र दिवसेंदिवस बदलत चालले आहे. तांबेंप्रमाणेच शुभांगी पाटील ह्या देखील पाठिंबा मिळवण्यात आघाडी घेत आहेत. तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा असतानाच आता स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराने केलेल्या दाव्यामुळे राजकारण बदलाची चिन्हं आहेत.
भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळणार असल्याचे स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी दावा केला आहे. तसेच संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू असून उद्यापर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतील, असे स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशकात उद्या काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा : ठाण्यात उद्धव ठाकरे बरसले; मोजक्याच शब्दांत एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार, मोठी घोषणाही केली!
भाजपचे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कालच स्पष्ट केले होते की, कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप पक्ष विचार करत असून लवकरच पाठिंबा जाहीर करणार आहोत. तसेच येत्या २८ जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये येणार असल्याचे म्हटले जाते. त्याच बरोबर स्वराज्य संघटनेचे संस्थापक संभाजीराजे छत्रपती हे देखील नाशिकमध्ये येणार आहेत. आता स्वराज्य संघटनेच्या या दाव्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा : साखरपुडयानंतर राधिका मर्चंट-अनंत अंबानी तिरुमालाला, भगवान व्यंकटेश्वराच्या दर्शनाला