त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्तेच्या पिंपळाचा पाडा इथे एकाच्या मृत्यूसाठी वृद्ध दाम्पत्यास जबाबदार धरण्यात आले. भुताळा व भुताळीन समजून त्यांना मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केला आहे. तर याबाबत हरसुल पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती याबाबत पाठपुरावा करत आहे.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून देण्यात आलेली सविस्तर माहिती अशी की, पिंपळाचा पाडा येथील भीमा बारकू तेलवडे यांच्या मोठ्या भावाचा गुजरातमधील मोहपाडा इथे दोन दिवसापूर्वी त्यांच्या पुतणीकडे वृद्धापकाळाने मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कळमुस्ते या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. मात्र, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वीच त्यांच्या मृत्यूला त्यांचा सख्खा भाऊ भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे हे भुताळा- भुताळीण असल्याने त्यांनीच काहीतरी मंत्र- तंत्र, जादूटोणा केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला, असा अंधश्रद्धेतून आरोप भाऊ बंदकीतील काही जणांनी केला. त्यातून चिडून जाऊन त्यांनी भीमा बारकू तेलवडे व त्यांच्या पत्नी भागीबाई भीमा तेलवडे यांना जबर मारहाण केली. त्यामुळे भीमा बारकू यांच्या डोक्याला जखम झाली आणि भागीबाई भीमा तेलवडे यांच्या छातीलाही जखम झाली. दोघांनाही जबर मार लागला आहे.
कळमुस्ते गावातील एक तरुण बाळू राऊत माळे यांनी जखमी अवस्थेत या वृद्ध दांपत्याला हरसुल पोलीस स्टेशनला आणले. अंनिसचे राज्यप्रधान सचिव डॉ. गोराणे यांनी हरसूल पोलिसांशी तातडीने संपर्क केला. वृद्ध दाम्पत्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्याबद्दल सुचवले आणि दोषींवर इतर कलमांसहित जादूटोणाविरुद्ध कायद्याचे कलम लावून गुन्हा दाखल करण्याबद्दल विनंती केली. हरसुल पोलीस ठाण्यात तेलवडे या वृद्ध दांपत्याला जबरमारहाण केल्याबद्दलचा गुन्हा त्यांच्याच भाऊबंदीतील काही जणांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे. मात्र, इतर कलमांसह जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावणे आवश्यक होते. ते मात्र हरसुल पोलिसांनी लावले नसल्याचे अंनिसने म्हंटले आहे.
सोमवारी अंनिसने तातडीने वृद्ध दांपत्याला नाशिक येथील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार करून ग्रामीण पोलीस अधीक्षकां समोर आणले. जबर मारहाण झालेले वृद्ध दांपत्य आणि त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी सांगितले की, मागील ७-८ वर्षांपासून गावातील काही लोक व भावकीतील काही लोक हे आई-वडिलांना भूताळा- भुताळणी ठरवून त्रास देत आहेत. त्याबद्दल मागील दोन वर्षांपासून जिल्हाधिकारी नाशिक, पोलीस अधीक्षक, नाशिक( ग्रामीण) व हरसुल पोलिसांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून रवी तेलवडे यांनी तक्रार दिलेली आहे. तसेच लेखीस्वरूपात तक्रारी केल्या आहेत. जर या लोकांवर वेळीच कायदेशीर कारवाई झाली असती तर आजचा हा जीवघेणा प्रसंग उद्भवला नसता, अशी खंत वृद्ध दांपत्य व त्यांचा मुलगा रवी तेलवडे यांनी व्यक्त केली.
कळमुस्ते येथील तेलवडे कुटुंबाला झालेल्या जबर मारहाणीच्या घटनेची सखोल चौकशीकरून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच या घटनेबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जादूटोणाविरुद्ध कलम लावण्यात यावे, असे विनंती पत्र महाराष्ट्र अंनिसच्यावतीने पोलीस अधीक्षक नाशिक (ग्रामीण) यांना देण्यात आलेले आहे.