यावर्षीही उंच दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून जास्तीत जास्त थर लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. यात खाली पडून काही गोविंदा जखमी झाले, तर काहींना किरकोळ दुखापत झाली. त्यांच्यावर पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. केईएम रुग्णालयामध्ये सर्वाधिक २६, तर राजावाडी रुग्णालयात आठ जखमींना उपचारार्थ दाखल करण्यात आले. कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी) सात जणांना उपचारासाठी आपण्यात आले होते. याशिवाय सायन ७, नायर ३, जे. जे. ४, सेंट जॉर्ज १, जीटी २, पोद्दार ४, बॉम्बे १, शताब्दी गोवंडी २, वांद्रे भाभा २, व्ही.एन. देसाई २, कुपर ४, ट्रॉमा केअर ४ याठिकाणी जखमी गोविंदांना दाखल करण्यात आले.
दुसरीकडे, ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सायंकाळी ६पर्यंत १३ गोविंदा जखमी झाले. त्यांच्यावर ठाण्यातील जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ३७ वर्षी महिलेला मणक्याला दुखापत झाल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय एका गोविंदाच्या मानेला, एकाच्या हाताला तर अन्य गोविंदांना किरकोळ दुखापत झाल्याचे जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलाश पवार यांनी सांगितले.
ठाण्यातील मानाच्या हंड्या फोडण्यासाठी मुंबईहून अनेक गोविंदा पथक ठाण्यात दाखल होत असतात. थरांच्या लागलेल्या चढाओढीमध्ये यंदाही काही गोविंदा जखमी झाल्याच्या घटना घडल्या. ठाण्यातील जिल्हा रुग्णालयात अनिकेत खाडे (२१, कांजुरमार्ग), अर्चना खेरणार (३४, मेघवाडी, जोगेश्वरी), राहुल केदार (२९, गोरेगाव) आणि पृथ्वी पांचाळ (२५, विरार) यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनिकेत अनिल मेंढकर (ठाणे), अक्षय कडू (२५), नरेंद्र धामनराव वाल्मिक (मुलुंड), पीयूष पी. लाला (१८, दिवा), सोमनाथ सुभाष सूर्यवंशी (२७ ) केदार पवार (२८), गौरव विष्णू चौधरी (२०) चैतन्य ढोबळे (२१, कल्याण) आकाश चव्हाण (२०, दिघा) अशा नऊ गोविंदांवर उपचार सुरू आहेत.