‘मी आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही. गरज भासल्यास सलाइन लावतो,’ अशा शब्दांत आंदोलक मनोज जरांगे यांनी मंगळवारी भूमिका मांडली होती. ‘मराठा आरक्षणासाठी सरकार तुमच्या पाठीशी उभे आहे. तुम्ही किमान एक महिना वेळ द्या,’ असे महाजन यांनी सांगितले. मात्र, त्यास जरांगे यांनी नकार दिला. त्यामुळे अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले उपोषण सोडविण्यात पुन्हा अपयश आले होते.
आरक्षणप्रश्नी सुरू असलेल्या उपोषणस्थळी मंगळवारी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री अतुल सावे, मंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, सतीश घाटगे यांनी भेट देऊन चर्चा केली. ‘सरकारला तीस दिवसांची मुदत द्या, तांत्रिक अडचणी आहेत, समिती कदाचित दहा-पंधरा दिवसांत काम करील, तुम्हीही मुंबईत येऊन समितीबरोबर मदत करा,’ असे महाजन यांनी सरकारतर्फे सांगितले. मात्र, मुंबईत येण्यास जरांगे यांनी नकार दिला.
जरांगे पाटील म्हणाले, ‘विदर्भाला कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळते, मग तुम्ही मराठवाड्यासाठीदेखील ते द्यायला हवे. आरक्षण देणे सरकारच्या हातात आहे. तुमचे ऐकून खूप वेळा आंदोलन मागे घेतले. आता आरक्षणाशिवाय उठणारच नाही. मला कोणालाच नाराज करायचे नाही. मी इथे शांततेत बसून राहतो. कोणालाही काही बोलत नाही. विनाकारण मी ताणून धरीत नाही. आरक्षण दिल्याचा मुख्यमंत्री आणि सचिवांची सही असलेला अध्यादेश द्या, आणखी चार दिवसांची मुदत त्यासाठी घ्या. तेव्हा तुमचे स्वागतच करेन आणि उपोषण सोडेन. ’
जरांगे पाटील यांचे राऊतांकडून कौतुक
जालन्यामध्ये एका लहानशा खेड्यामध्ये उपोषणाला बसलेला जरांगे पाटील तुमच्या प्रलोभनांना वा दबावाला झुकत नाही याचे कौतुक आहे. महाराष्ट्राला सरकारने दिलेली वचन पोकळ आणि फसवी होती. सोमवारी एक आमदार आणि जामनेरचे एक मंत्रीही भेटायला गेले. परंतु आंदोलन संपले नाही. ५० खोक्यांनी विकली जाणारी वा खोक्यांसमोर झुकणारी ही माणसे नाहीत. साधी गरीब फाटकी माणसं आहेत. ती न्यायासाठी लढा देत आहेत, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावर मंगळवारी भाष्य केले.