मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा होताना दिसला. गेल्या चार दिवसांमध्ये विरोधकांनी झोंबरी घोषणाबाजी करून सत्ताधाऱ्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे बुधवारी सकाळपासून भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते. कोव्हिड भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन या आमदारांनी बॅनर्स झळकावले. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित पवार आणि अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या नेतृत्त्वाखालील मविआचे आमदारही त्याठिकाणी आले. मविआच्या आमदारांनीही फलक झळकावत घोषणाबाजी करायला सुरुवात केली. यावेळी मविआच्या आमदारांना गाजराच्या माळा आणल्या होत्या. ‘गाजर देणं बंद करा, ओला दुष्काळ जाहीर करा’, अशी घोषणाबाजी मविआने केली. हे सगळे सुरु असताना सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोर आले. दोन्ही बाजूचे आमदार आक्रमक असल्यामुळे बाचाबाचीचा प्रकार घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी हे रागाच्या भरात सत्ताधारी आमदारांच्या अंगावर धावून जाताना दिसत होते. त्यामुळे विधिमंडळाच्या परिसरात प्रचंड गदारोळ माजला होता. अखेर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्ये पडत विरोधी पक्षाच्या आमदारांना बाजूला नेले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या चार दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केलेल्या घोषणाबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘आले रे आले गद्दार आले’, ‘५० खोक्के एकदम ओक्के’, ‘गद्दारांना भाजपची ताटवाटी, चलो चले गुवाहाटी’, अशा एकापेक्षा एक झोंबणाऱ्या घोषणांनी महाविकास आघाडीने शिंदे गट आणि भाजपला जेरीस आणले होते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी होताना दिसत होते. त्यामुळे आता अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप-शिंदे गटाने आपली रणनीती बदलल्याचे दिसत आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांप्रमाणेच बुधवारी भाजपचे आमदार विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या देऊन बसले होते. या आमदारांनी महाविकास आघाडीच्या ‘५० खोके-ओक्के’ला चोख प्रत्युत्तर दिले. भाजपच्या या आमदारांकडून बॅनर्स झळकावण्यात आले. यावेळी भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनीही अनेक घोषण दिल्या. ‘बीएमसीचे खोके, मातोश्रीचे ओके’, ‘स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके’, ‘सचिन वाझेचे खोके, मातोश्री ओके’, अशा घोषणांनी सत्ताधाऱ्यांनी हा परिसर दणाणून सोडला होता.