दोन तरुण कोरियन तरुणीची छेड काढत असताना एक मुलगा तिथे येतो आणि तिची त्या प्रसंगातून सुटका करतो. तर एका तरुणाने या घटनेचा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचवून दोघा आरोपींना पकडून देण्यात व कोरियन महिलेची मदत करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. या तरुणीने दोन्ही तरुणांचे खास पद्धतीने आभार मानले आहेत. अथर्व आणि आदित्य अशी या दोन्ही तरुणांची नावे आहेत.
कोरियाची नागरिक असलेली तरुणी काही दिवसांपूर्वी मुंबईत आली होती. ही तरुणी युट्युबवर चॅनेल चालवत असून तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. लाइव्ह व्लॉगच्या माध्यमातून ती मुंबईतील आपले अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर करत होती. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने तिच्यासोबत जबरदस्तीने बोलायला सुरुवात केली. तरुणी त्याला टाळायचा प्रयत्न करीत असतानाही तो तिच्या अंगलट आला. शरीराला, गालाला स्पर्श करीत त्याने विनयभंग केला. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत तरुणीने तिथून काढता पाय घेतला. दुचाकीवरून हे दोघे पुन्हा त्या तरुणीच्या मागे आले आणि दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती करू लागले.
वाचाः आधी गोळीबार, नंतर सपासप वार; सराईत गुन्हेगाराला संपवलं, पिंपरी- चिंचवडमध्ये सिनेस्टाइल थरार
तरुणीने कानाडोळा करीत तिथून पळ काढला. मात्र, तरीही ते दोघं दुचाकीवरुन मागे येत होते. त्याचवेळी तिथे अथर्व नावाचा तरुण आला आणि त्याने त्या दोघांना थांबण्यास सांगितले. त्यानंतर अथर्वने त्या तरुणीला सुरक्षितपणे तिच्या हॉटेलपर्यंत पोहोचवलं. तर, दुसरीकडे युट्यूबर लाइव्ह असल्याने अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाला. छेडछाडीचा हा प्रकार आदित्य नावाच्या तरुणाने पोलिसांपर्यंत पोहोचवला.
पोलिसांनी लगेचच आदित्य आणि मुलीशी ट्विटरवर संपर्क साधला. तसंच, सू-मोटो कारवाईपर्यंत या दोघा तरुणांनी तिची मदत केली. कोरियन युट्यूबरने आदित्य आणि अथर्वचे खास पद्धतीने आभार मानले आहेत. तिने दोघांनाही तिने हॉटेलमध्ये जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. तिने तिघांचा फोटो ट्वीट करत त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले आहेत.
वाचाः नववर्षाचं मुंबईकरांना मिळणार ‘बेस्ट’ गिफ्ट; बस प्रवास होणार अधिक सुकर