Kohatyacha por, 'कोल्हाट्याचं पोर' मधील आईचा घरासाठी वनवास संपेना; शांताबाई काळेंची परवड सुरूच - the author of kolhatyacha por dr kishor shantabai kale mother wandering for home still continues

सोलापूर : ‘कुणी घर देतं का घर?’ हा नटसम्राट या अजरामर नाटकातील संवाद प्रत्येकाच्या मनात घर करून राहिला आहे. मात्र, घरापासून वंचित राहिलेल्या ‘कोल्हाट्याचं पोर’कार डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे या हा संवाद जगत आहेत. घरासाठी त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते मंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अर्ज-विनंत्या केल्या. तरीही घर मिळेना. राहायला घरही मिळेना आणि वेळेवर कलावंतांचे मानधनही मिळेना. मदतीसाठी शांताबाईंची मदतीसाठी वर्षानुवर्षे भटकंती सुरूच आहे. अशा परिस्थितीत “सांगा कसं जगायचं ?” आणि या ज्येष्ठ कलावंतास “कुणी घर देता का घर” असा आर्त टाहो ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांनी फोडला आहे.

‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा दिनांक १९ फेब्रुवारी २००७ रोजी वयाच्या ३७ व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. मोठा आधार कोसळला. चाळीस वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि या लावणीच्या बळावर मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत.

मानधनही वेळेवर मिळत नाही

निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे १५०० रुपये मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. भाड्याने तर कधी इतरत्र राहावे लागते. भाडं द्यावं की पोट भरावं असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा विदारक परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावे लागत आहे.

डॉ राजेंद्र भारूड असताना मिळाली होती मदत

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी साडेचार वर्षांपूर्वी शांताबाई काळे यांना घर देण्याचेआश्वासन दिले होते. तेवढ्यावरच न थांबता डॉ. भारुड यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध केली. त्या जागेच्या उताऱ्यावर शांताबाई काळे यांचे नावही लागले. बांधकाम सुरू झाले होते. दरम्यान, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली. त्यानंतर मात्र अचानक विविध अडचणीमुळे हे बांधकाम खोळंबले आहे. प्रशासकीय स्तरावरही संबंधित अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष झाले.

आता फक्त मिळत आहेत आश्वासने

त्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून त्यांनी अर्ज विनंती केली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीचा पाठपुरावा केला. आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींनाही निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनाही निवेदन दिले. मात्र, आश्वासनापलीकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही.

स्वतःच्या हक्काचं घर मिळावे” हीच शेवटची इच्छा!

शांताबाईंना मुलाच्या निधनानंतर उदरनिर्वाचा प्रश्न गंभीर झाला असून त्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. संघर्ष करावा लागत आहे. आणखी किती हेलपाटे मारायचे ? ६९ वर्षे इतके वय असताना आता पुढे हेलपाटे मारणे शक्य नाही. आता तरी मुख्यमंत्री व शासनाने हक्काचं घर मिळवून द्यावे आणि स्वतःच्या हक्काचे घर द्यावे अशीच शेवटची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे.

हक्काचे घर मिळावे, जेष्ठ कलावंत म्हणून वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी त्यांना वर्षानुवर्षे कागदपत्रांची बॅग सोबत घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत. ज्येष्ठ कलावंतास “कुणी घर देता का घर” असाच अर्थ टाहो शांताबाई काळे या फोडत आहेत. आता त्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Source link

By jaghit