भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेतील दुसरा सामना (Ind vs Aus) शुक्रवारी नागपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने ६ गडी राखून ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सुरुवातीला सामन्यावर अनिश्चिततेचे ढग होते. पहिला सामना गमावल्यानंतर क्रिकेट रसिकांचे डोळे या मॅचकडे लागून राहिले होते. टीव्ही-इंटरनेटवर ही मॅच पाहणाऱ्या चाहत्यांचा हिरमोड झाला होता.
शेतकऱ्याने बकऱ्या विकून मॅचचं तिकीट काढलं
घरातील बकऱ्या विकून तिकीट काढत मॅच पाहायला गेलेल्या नागपूरच्या एका शेतकऱ्याचा चांगलाच भ्रमनिरास झाला. वैताग व्यक्त करणारा या युवा शेतकऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नागपूरात हवामान खात्याने मॅचच्या दिवशी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार पाऊस बरसला आणि मैदान ओले झाले. खेळपट्टी ओली असल्यामुळे सामना टी २० सामना वीसऐवजी ८ षटकांचा खेळवला गेला. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, या सामन्याला पावसानेही हजेरी लावल्यामुळे मॅच सुरु होण्यास विलंब झाला. रात्री साडेनऊ वाजता हा सामना सुरु होईपर्यंत अनेक जण कंटाळले होते. यावेळी हा सामना पाहण्यासाठी आलेल्या एका शेतकरी तरुणाने आपला व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला.
हा सामना बघण्यासाठी मी माहूरहून आलो. माहूरपासून २० किमी अंतरावर माझं गाव आहे. माझा खूप हिरमोड झाला आहे. मी माझ्या घरच्या दोन बकऱ्या विकून.. जवळपास साडेआठ हजाराला बकऱ्या विकल्या, त्यातून पाच हजाराचं तिकीट काढलं, तीन-चार हजार रुपये इकडे खर्च आला. आणि तीन किलोमीटर पायी आलो, असा हिरमोड आयुष्यात कधीच झाला नाही. आता यानंतर मी कुठलीच मॅच पाहायला येणार नाही, मी माझ्या घरी टीव्हीवर फुकटात पाहीन, जय हिंद जय महाराष्ट्र, असे वैतागलेल्या तरुणाने व्हिडिओत म्हटले.