आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासुरवाडीतच घरजावई म्हणून राहत होता. त्याने रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच पत्नी नूतन साबळे (वय २३) आणि सासू सुरेखा दिलीप दांगट (वय ४५) यांचा डोक्यात लोखंडी रॉडने मारून खून केला. त्यानंतर आपल्या लहान मुलीला नातेवाइकांकडे सोडून तो फरार झाला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. तेव्हा गुरूवारी दुपारी सागरने नगरजवळच्या एमआयडीसी परिसरात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
आरोपी साबळे याची पत्नी माहेरी राहत होती. त्यावरून तिच्यासोबत आणि सासूसोबत त्याचे वाद होते. पत्नी सासरी येत नसल्याने अखेर सागर तिच्या माहेरी येऊन राहण्याचा पर्याय निवडला. तेथे राहून तो एमआयडीसीमध्ये नोकरी करीत होता. पंधरा ऑगस्टच्या दिवशी सासूने धोंडे जेवण आयोजित केले होते. दिवसभरात अन्य पाहुणे येऊन गेले. मात्र, रात्र झाली तरी सागर आलाच नाही. त्यामुळे सर्व जण झोपी गेले. त्यानंतर घरी आलेल्या सागरने दोघींचा खून केला. आपल्या लहान मुलीला त्याने नातेवाइकांच्या घरी नेऊन सोडले आणि नंतर पसार झाला. नातेवाइकांना शंका आल्याने त्याने दांगट यांच्या घरी येऊन पाहिल्यावर ही घटना उघडकीस आली.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन जावयाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना सागरने नगरजवळच्या एमआयडीसी परिसरात सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. कौटुंबिक वादातून ही हत्या-आत्महत्या झाल्याची माहिती आहे.