‘सत्ताधाऱ्यांवर टीका करीत असल्याने मला स्वस्थ झोपू देणार नाहीत. मात्र, कारागृहात जाण्यासाठी मी घाबरत नाही. सत्ता एकाच पक्षाकडे टिकून राहत नाही, हे लक्षात घ्यावे. राज्यात आमची सत्ता आल्यानंतर त्यांना जागा दाखवू,’ असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने वडेट्टीवार यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, आमदार ॲड. अभिजित वंजारी, प्रतिभा धानोरकर, सुधाकर अडबाले, काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे, सुभाष गौर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष रामू तिवारी, नंदू नागरकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वडेट्टीवार म्हणाले, ‘राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. दररोज बलात्कार, अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कायदा बदलण्याची मोहीम राबविली जात आहे.’ २०२४मध्ये सत्ता परिवर्तन केले नाही, तर देशात हुकूमशाही लादली जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.