उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट म्हणजे ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार रिंगणात आहेत, भाजपच्या मुरजी पटेल यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज बाद ठरला, तर बाहेर फेकले जाण्याची नामुष्की टाळण्यासाठी खबरदारी म्हणून पटेल यांनी भाजपकडूनच दोन अर्ज भरले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दोन अर्ज भरण्यात आले आहेत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवार आहेत. पण सावधगिरी म्हणून संदीप नाईक यांचा अर्ज भरण्यात आला आहे.
शिवसेना, भाजपशिवाय पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक, सैनिक समाज पार्टी, भारत जनआधार पार्टी, महाराष्ट्र विकास आघाडी, उत्तर भारतीय विकास सेना, राष्ट्रीय मराठा पार्टी, आपकी अपनी पार्टी याशिवाय काही अपक्षांनी अर्ज भरले आहेत.
या एकूण उमेदवारी अर्जांची आज छाननी होणार आहे. सोमवार १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आलेल्या २५ अर्जांमधून आता किती उमेदवार माघार घेतात याची उत्सुकता आहे.
या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेच. मात्र शिंदेंचं बंड आणि सत्तांतर यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. आगामी मुंबई महापालिकेची समीकरणं यावर ठरतील. तसंच मतदारांचा कौलही समजणार आहे.
हेही वाचा : कारण नसताना गैरसमज करू नका; अजित दादा पत्रकारांवर बरसले
मटा ऑनलाईनचा पोल काय सांगतो?
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने ट्विटरवरुन नेटिझन्सचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अंधेरी पोटनिवडणुकीत कमळ विरुद्ध मशाल लढत होणार आहे, दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरले; कोण मारणार बाजी? तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ११२२ ट्विटराईट्सनी आपली मतं नोंदवली. यापैकी तब्बल ७९.५ टक्के नेटिझन्सनी ऋतुजा लटके (ठाकरे गट) यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तर २०.५ टक्के ट्विटराईटना मुरजी पटेल (भाजप) विजयी होतील, अशी खात्री व्यक्त केली.
हेही वाचा : जम्पिंग जॅक बाळ्यामामांची सहावी राजकीय उडी, सुरेश म्हात्रेंचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश