सांगलीत रंगलेल्या या राजकीय जुगलबंदीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. यावेळी सुरुवातीला संजयकाका पाटील यांचे भाषण झाले. तेव्हा संजयकाका यांनी म्हटले की, ‘काल तुमची न्यूज टीव्हीवर ऐकली. संभाजी पाटलांनी काही वक्तव्ये केली की लातूरचे नेते भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. आजचा कार्यक्रम हा जयदेव बर्वे यांनी घेतलेला आहे. ज्यांच्या वाड्यामध्ये साठ वर्षांपासून संघाची शाखा लागते त्यांच्या नसानसात संघाच्या माध्यमातून भाजपचे काम आहे. अशा कार्यक्रमाला तुम्ही आलाय आणि मी तुम्हाला त्याबाबतीत आग्रह न करणं हे यथोचित होणार नाही. त्यामुळे भाजपचा खासदार म्हणून तुम्हाला आमच्या पक्षात येण्याचा आग्रह करतो’, असे संजयकाका पाटील म्हणाले.
यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या अमित देशमुख यांनी आपल्या मिश्कील शैलीत संजयकाका पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरला प्रत्युत्तर दिले. ‘लातूरचा देशमुख वाडा कितीही वादळे आली आणि कितीही संकटे आली तरी आहे तिथेच राहणार आहे. मला बोलवणाऱ्यांनी स्वतः स्वगृही (काँग्रेसमध्ये) यावे’, अशी उलट ऑफर अमित देशमुखांनी संजयकाकांना दिली. अमित देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे ते तुर्तास तरी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
राज्यात कधीही नवे सरकार येऊ शकते: अमित देशमुख
‘आताची पाच वर्षे ही चमत्कारिकच राहिली. सध्या राज्यात हे तिसरे सरकार आहे. पहिले सरकार हे अडीच दिवसाचे होते. दुसरे सरकार हे अडीच वर्षाचे होते तर तिसरे सरकार हे सध्या सत्तेत आहे आणि चौथे सरकार कधीही येऊ शकेल अशी परिस्थिती आहे. काहीही सांगता येत नाही. महाराष्ट्रात निवडणुका होतच नाहीत. निवडणुका कधी होतील हे ही सांगता येत नाही’, असेही यावेळी अमित देशमुख यांनी म्हटले.
बावनकुळे म्हणतात, प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच अमित देशमुख यांच्या भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेसंदर्भात भाष्य केले होते. ‘येत्या काही दिवसात भाजपमध्ये अनेक मोठमोठे नेते प्रवेश करतील. महाविकास आघाडीतील नेत्यांचा पूर्ण पक्ष रिकामा होईल. शिवसेनेचे अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील आणि महाराष्ट्राला धक्का बसेल असे प्रवेश होतील’, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केला होता.