बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे प्रदीप अंगत साबळे या सातवीतील मुलाने आत्महत्या केली आहे. प्रदीप हा १३ वर्षांचा असून त्याने एका छोट्याशा कारणावरुन आत्महत्या केली आहे. अंगत साबळे यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सात दिवसांपूर्वी झाला होता. बहिणीच्या विवाहासाठी भाऊ प्रदीप हा बीडहून गावी आला होता.
विवाह सोहळा पार पडल्यानंतर वडील अंगत साबळे यांनी प्रदीपला बीडला शिक्षणासाठी जाण्यास सांगितलं. प्रदीपने बीडला शिक्षणासाठी जाण्यास नकार दिला. उलट वडील त्याला रागाने बोलले याचा राग मनात धरून तो थेट शेतात निघून गेला. या ठिकाणी प्रदीपने वेगळच पाऊल उचललं. प्रदीपने पीक राखणीच्या माळ्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जेव्हा याबाबत त्याच्या घरच्यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
इतक्या छोट्याशा कारणावरून प्रदीप इतकं टोकाचं पाऊल घेईल यावर साबळे कुटुंबाचा विश्वासच बसत नाहीये. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहताच घरातील प्रत्येकाने हंबरडा फोडला. अवघ्या सात दिवसांपूर्वीच मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. सात दिवसापूर्वी घरात लग्नाचा मंडप होता आनंद उत्सव होता. मात्र, सात दिवसानंतर संपूर्ण कुटुंबावर मुलाच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे. याविषयी वडवणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.