या घटनेची माहिती सातारा पोलिसांनी मिळताच, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दहशत माजवणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले तर काहींनी पळ काढला. मात्र, सातारा शहर पोलिसांची एक टीम घटनास्थळी येताच यातील ३ संशयितांचा पाठलाग करून पोलिसी खाक्या दाखवत त्यांना ताब्यात घेतलं.
पोवई नाक्यावर कोयता नाचवून दहशत माजवल्या प्रकरणी सातारा पोलिसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतले असून इतर संशयितांचा तपास करण्यासाठी सातारा शहर पोलीस आणि एलसीबीची टीम रवाना झाली आहे. पुण्यानंतर साताऱ्यात देखील कोयता गँग सक्रिय झाली आहे का? आणि पुण्यातील कोयता गँगचे साताऱ्यातील कोयता गँगशी काही संबंध आहेत का याची देखील सातारा पोलीस माहिती घेत आहेत.
भर वस्तीत कोयता नाचवून दहशत माजवल्याने साताऱ्यात या घटनेमुळे घबराट पसरली असून पोलिसांनी या कोयता गँगवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सातारकर नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करू लागले आहेत.