औद्योगिक वसाहतीत मजुरीचे काम करीत असलेला किशोर आटोळे व त्याची पत्नी इंदुबाई आटोळे हे जोडपे शंकरनगर भागात भाड्याने खोली घेऊन काही महिन्यांपासून वास्तव्याला आहेत. मूळचे बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील शेळगाव येथील किशोर हा पोटापाण्यासाठी मजुरी करायला सपत्नीक जालन्यात राहायला आला.
आज सकाळी उशिरापर्यंत आटोळे यांच्या घराला बाहेरून कडी लावलेली आढळून आल्याने घर मालकाने जवळच राहणाऱ्या आटोळे यांच्या बहिणीला बोलावून घेतले आणि खोली उघडली. त्यावेळी पलंगावर इंदूबाई किशोर आटोळे (वय ४० वर्ष) ही मृतावस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर मार लागल्याचा मोठा घाव होता.
घरमालकाने तातडीने घटनेची माहिती कदीम जालना पोलिसांना कळवली. घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू, सहायक पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे,पोलीस हवालदार कैलास जावळे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला आहे.
हेही वाचा : बापलेकाची पहिली भेट अधुरीच; २ महिन्यांच्या लेकराच्या भेटीसाठी जाताना तरुणाला मृत्यूने गाठले
पती किशोर आटोळे हा अद्याप सापडलेला नसल्याने त्याने खून करुन पोबारा केला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. चाळिशी येऊनही पत्नीची कूस उजवली नसल्याच्या कारणावरुन किशोर यानेच इंदूबाईंचा खून केला असल्याचंही बोललं जात आहे.
हेही वाचा : ठाकरेंना रक्ताने पत्र लिहिणाऱ्या युवासेना तालुका प्रमुखाचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न